Hinjewadi Shivajinagar Metro Pudhari
पिंपरी चिंचवड

Hinjewadi Shivajinagar Metro: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला सीएमआरसीची मंजुरी; १५ दिवसांत प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता

२३.३० किलोमीटर मार्गावरील १७ स्टेशन सज्ज; मेट्रो सुरू करण्याचा अंतिम निर्णय राज्य सरकारचा, उद्घाटनाच्या दिवशी तिकीट दर जाहीर होणार

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.३० किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गास मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची (सीएमआरसी) मंजुरी मिळाली आहे. सर्व कामे पूर्ण झाली असून, येत्या १५ दिवसांत मेट्रो सुरू करता येईल; मात्र मेट्रो प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारचा आहे. सरकारने निर्णय घेतल्यानंतर प्रत्यक्ष प्रवासी सेवा लवकरच सुरू होईल, अशी माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवार (दि. २९) दिली आहे.

आकुर्डी येथील पीएमआरडीएच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. डॉ. चौधरी म्हणाले की, या प्रकल्पातील मेट्रो प्रथम १२ स्टेशनवर मेट्रो धावणार होती. मात्र, मुदतीमध्ये काम पूर्ण न झाल्याने तसेच, निम्म्या मार्गावर मेट्रो सुरू केल्यास अपेक्षित प्रमाणात प्रवाशांचा प्रतिसाद मिळणार नाही. शिवाजीनगर येथे पुणे मेट्रोशी कनेक्टिव्ही निर्माण झाल्यास या मार्गावरील प्रवासी संख्येत मोठी वाढ होईल.

त्यामुळे संपूर्ण २३ किलोमीटर मार्गावर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण मार्गास तसेच, १७ स्टेशनला सीएमआरसीची परवानगी मिळाली आहे. येत्या १५ दिवसांत सर्व कामे पूर्ण होतील. त्यानंतर प्रवासी वाहतूक सुरू करता येईल. मात्र, तो निर्णय सरकार घेणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड कंपनीकडून पीपीपी तत्त्वावर केला जात आहे.

मुदतीमध्ये काम पूर्ण न झाल्याने या कामास डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तरीही काम पूर्ण न झाल्याने डिसेंबर २०२६ ची दुसरी वर्षभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर उर्वरित किरकोळ कामे व दुरुस्तीसाठी तीन महिन्यांचा म्हणजे ३१ मार्च २०२७ पर्यंतची वेळ दिली जाणार आहे. कामास विलंब केल्याने संबंधित कंपनीस अनेकदा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कोणत्या कारणांमुळे कामास विलंब झाला याचा शोध घेऊन कंपनीवर कारवाई केली जाईल, असे डॉ. चौधरी यांनी सांगितले.

उद्‌घाटनाच्या दिवशी तिकीट दर जाहीर करू

मेट्रो सुरू झाल्यानंतर मार्गावरील प्रवासांचा प्रतिसाद, फेर्‍या आदीं बाबी तपासून घेऊन, तिकीट दर निश्चित केला जाणार आहे. उद्‌घाटनाच्या दिवशी तिकीट दर जाहीर केला जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT