पिंपरी: हिंजवडी, म्हातोबा टेकडीजवळील अंगणवाडी क्रमांक तीनमध्ये बुधवारी (दि. 26) दुपारी चक्क 20 चिमुकल्यांना कोंडून सेविका आणि मदतनीस ग््राामपंचायतमधील बैठकीला निघून गेल्याची धक्कादायक घटना उडकीस आली आहे. दरवाजा बंद होताच लहान मुले घाबरून मोठ्याने रडू लागल्याने हा प्रकार उडकीस आला.
या प्रकरणी सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांना खुलासा देण्यास सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हिंजवडी ग््राामपंचायतचे माजी सरपंच शिवनाथ जांभुळकर यांनी बुधवारी पर्यवेक्षिका संध्या विश्वासराव यांना फोन करुन हिंजवडी ग््राामपंचायतअंतर्गत सहा अंगणवाडी केंद्राच्या सेविका व मतदनीस यांना ग््राामपंचायत कार्यालय येथे बैठकीसाठी उपस्थित रहाण्यास सांगितले होते. पर्यवेक्षिका यांनी फक्त सेविका यांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच, मदतनीस यांना अंगणवाडीमध्ये थांबायला सांगितले होते.
मात्र, बैठकीस केवळ अंगणवाडी सेविकाच उपस्थित असल्याने सरपंच जांभुळकर यांनी मदतनीस यांनाही तत्काळ बैठकीस उपस्थित राहण्यास सांगितले. त्यामुळे मतदनीस शिल्पा साखरे यांनी तीन पालकांना अंगणवाडीतील मुलांकडे लक्ष देण्यास सांगून सेफ्टी दरवाज्याला कुलूप लावून ग््राामपंचायत कार्यालयात बैठकीसाठी गेल्या.
थोड्यावेळाने दरवाजा बंद केल्यानंतर मुले घाबरली आणि त्यांनी रडण्यास सुरुवात केली. यामुळे पालकांनी सेविकेला अनेकदा फोन केला; परंतु त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर एकात्मिक बालविकास योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. रडण्याच्या आवाजामुळे तेथे उपस्थित पालक उज्ज्वला गांगुर्डे यांनी बालविकास प्रकल्पाधिकारी धनराज गिराम यांना फोन करून याबाबतची माहिती दिली.
धनराज गिराम यांनी तात्काळ शिल्पा साखरे यांनी फोन करुन अंगणवाडी केंद्रात उपस्थित राहण्यास सांगितले. वरिष्ठांचा फोन गेल्यावरच सेविका-मदतनीस परतल्या आणि दार उघडले. अंगणवाडी केंद्रात बालकांना दरवाज्यास कुलूप लावून बैठकीस उपस्थित राहणे ही बाब बालकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टिने अतिशय गंभीर आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी घटनेची माहिती घेतलेली आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागास सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दोषींवर कारवाई होणार : सीईओ पाटील
हिंजवडी ग््राामपंचायत हद्दीतील अंगणवाडी केंद्र क्रमांक 3 येथे 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना सेफ्टी दरवाज्याचे कुलूप लावून कोंडल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. 26) घडली. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत चौकशी सुरू केली असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.
अंगणवाडी केंद्रात बालके असताना सेफ्टी दरवाज्यास कुलूप लावून केंद्र बंद केल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर तत्काळ चौकशीचे आदेश देण्यात आले. विस्तार अधिकारी सुनील शेटे व अंगणवाडी पर्यवेक्षिका संध्या विश्वासराव यांनी घटनास्थळी भेट देत प्राथमिक चौकशी केली. मदतनीसांनी बैठकीला जाण्यासाठी व सुरक्षा म्हणून कुलूप लावल्याचा दावा केला असला तरी बालकांना कुलूपबंद करून केंद्र सोडणे ही अत्यंत गंभीर व बालसुरक्षेच्या दृष्टीने अमान्य बाब असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
या प्रकरणाची गंभीर दखल आम्ही घेतली आहे. घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे. सेविका व मदतनीस यांच्याकडून अहवाल मागवला असून, या प्राथमिक चौकशी केली आहे. यात जर जाणूनबुजून काही प्रकार केला असेल तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल.धनराज गिराम, बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, मुळशी