

रावणगाव: बोरीबेल (ता. दौंड) परिसरात बिबट्याने मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला असून येथील एका शेतकऱ्याचे वासरू गुरुवारी (दि. 27) पहाटे खाल्ले. प्राण्यांवर बिबट्याच्या हल्ल्याची घटना दिवसेंदिवस वाढू लागल्याने ग््राामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
बोरीबेल परिसरातील पाचपुते मळा या ठिकाणी गुरुवारी सकाळी ही घटना निदर्शनास आली. शेतकरी बाळकृष्ण पाचपुते यांनी आपल्या शेतात जनावरे बांधली होती. यामधील 3 वर्षे वयाचे वासरू बिबट्याने हल्ल्यात मारून उसाच्या शेतात ओढत नेत खाल्ले. मागील आठवडाभरापासून बिबट्याचे कदम वस्ती, भापकर वस्ती परिसरात वास्तव्य आहे. बुधवारी भापकर वस्ती येथे एका कुत्र्याचा फडशा पाडल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी सकाळी बिबट्याने वासरू मारले.
या घटनेने बोरीबेल परिसरातील ग््राामस्थ आक्रमक झाले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बाधित शेतकरी बाळकृष्ण पाचपुते यांनी तालुका वन परिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांना घटनेची माहिती कळवताच त्यांनी वनरक्षक शुभांगी मुंढे, वन कर्मचारी शरद शितोळे यांना घटनास्थळी पाठवले.
त्यांनी मृत वासराचा पंचनामा करीत ग््राामस्थांसोबत संवाद साधत जनजागृती करत तातडीने भापकर वस्ती परिसरातील लावलेला पिंजरा पाचपुते मळ्यात ग््राामस्थांच्या सहकार्याने लावला.
बिबट्यांची नेमकी संख्या कळेना
दौंड तालुक्याच्या पूर्व भागात मलठण, हिंगणीबेर्डी, स्वामी चिंचोली, रावणगाव, बोरीबेल, मळद या परिसरात बिबट्यांचा वावर असल्याचे वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे या परिसरात बिबट्यांची संख्या किती आहे हे स्पष्ट होत नाही; मात्र वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या या भागातील वास्तव्यास दुजोरा दिला आहे.