पिंपरी: तळेगावजवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल रविवारी (दि. 15) दुपारी कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी झाले. यात घडलेला एक प्रसंग उपस्थितांना अश्रू अनावर करून गेला. या घटनेने माणुसकीला खरे रूप मिळाले.
कुंडमळा गावातील रहिवासी भेगडे (57) हे एका लग्नसमारंभावरून घरी परतत होते. त्यांच्यासोबत त्यांचा विश्वासू कामगार छोटू (20) होता. पुलावर गर्दीचा कहर झाला होता. समोरासमोर आलेल्या दुचाकींमुळे हालचाल थांबली आणि काही क्षणांतच पुलावर भार वाढल्याने तो कोसळला. (Latest Pimpri News)
हा सगळा प्रकार काही सेकंदांत घडला. मोठा आवाज, पाण्याचा गडगडाट... आणि भेगडे थेट पाण्यात कोसळले. हे सर्व छोटूच्या डोळ्यांसमोर घडले. क्षणभर तो सुन्न झाला. पण लगेच सावरला. घाबरलेल्या लोकांतून वाट काढत तो पाण्याकडे धावला.
माझ्या डोळ्यांसमोर मालक पाण्यात गेले. कोणीच काही करत नव्हते. मी आरडलो... मदतीसाठी हाक मारली आणि पाण्याकडे धावलो, छोटूच्या थरथरत्या आवाजात भीती, वेदना आणि निष्ठा स्पष्ट जाणवत होती.
छोटूच्या या धाडसाने इतर नागरिकही सावरले. काहींनी एकत्र येऊन भेगडे यांना शोधायला सुरुवात केली. पाण्याचा प्रवाह, लोखंडी सांगाडा आणि गोंधळ यामध्येही सगळ्यांनी जीव धोक्यात घालून प्रयत्न केले आणि काही वेळाने भेगडे यांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. मात्र त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
या धावपळीत छोटूच्या हातालाही जखम झाली. पण तो म्हणतो, पायाला थोडं लागलंय, चालून जाईल. पण मालक वाचणं महत्वाचं आहे. ते मला घरच्यासारखं वागवतात. त्यांना काही झाले असते, तर मी स्वतःला कधी माफ केले नसते.
हा प्रसंग पाहणार्या ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. पूल कोसळल्यानंतर कोणी पुढे जायची हिंमत करत नव्हते. पण छोटूचं धाडस पाहून आम्हीही धावलो, असे काहींनी सांगितलं. कुंडमळा पूल दुर्घटनेने अनेकांचे आयुष्य हादरवले. पण अशोक भेगडे आणि छोटू यांच्यातील स्नेह, आपुलकी आणि नात्यातून झळकलेली माणुसकी चर्चेचा विषय ठरली आहे.