संतोष शिंदे
पिंपरी: कुंडमळा येथे पूल कोसळून पर्यटकांचा मृत्यू झाल्याने राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे; मात्र या दुर्घटनेमागे हुल्लडबाजी आणि सोशल मीडियाचा अतिरेक ही गंभीर कारणे समोर आले आहेत.
परिसरातील स्थानिक नागरिक, लष्कराचे जवान आणि पोलिसांकडून वारंवार दिल्या जाणार्या सूचना, नियमावली आणि सावधगिरीचा पुनःपुन्हा भंग केल्यामुळेच ही दुर्घटना ओढवली, असा स्थानिकांचा संतप्त आरोप आहे.
मागील काही वर्षांपासून सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ, फोटो आणि इंस्टाग्रामवरील रिल्स यामुळे कुंडमळा परिसरात पर्यटकांची गर्दी झपाट्याने वाढली. धबधबे, वेगाने वाहणार्या इंद्रायणी नदीतील खडकांवर उभे राहून ’अॅक्शन रिल्स’ बनवणे, पूलाच्या मधोमध उभे राहून पोझ देणे, दुचाकीवरून पुलावरून लाईव्ह जाताना ’स्टोरी’ टाकणे हे चित्र सर्रास दिसत होते.
रविवारी झालेल्या दुर्घटनेपूर्वीही अनेक पर्यटक पूल ओलांडत होते. काहींनी दुचाकी थांबवून मोबाईल सेट करून व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले होते. काहीजणांनी आपल्या मुलांना खांद्यावर घेत ’सेल्फी’ घेण्याचा प्रयत्न करत असतानाच पूल कोसळल्याचे स्थानिक सांगतात.
या भागात अनेकदा पोलिसांनी, स्थानिक ग्रामस्थांनी तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकांनी सूचना फलक लावले होते. पूल जुना आहे, गर्दी करू नका, ’प्रवाह वेगवान आहे, पाणी वाढले आहे’, ’रात्री उशीरापर्यंत थांबू नका’, अशा जाहीर सूचना दिल्या होत्या; मात्र पर्यटकांनी या सुचनांकडे दुर्लक्ष केले. काहीजण तर रात्री 11 वाजेपर्यंत देखील या भागात थांबून अश्लील चाळे करत असल्याचे यापूर्वी निदर्शनास आले आहे.
खा. सुुप्रिया सुळे यांनी दिला नातेवाईकांना धीर
घटनास्थळी खा. सुुप्रिया सुळे येताच दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांचे नातेवाईक त्यांना भेटले. माझे जावई आणि नातवाचा अजून शोध लागलेला नाही, त्यांच्याबाबत आम्हांला काही माहिती मिळत नाही, त्यावेळी सुळे यांनी त्यांना धीर देत ते सुखरूप असू शकतात, त्यांना रूग्णालयात दाखल असू शकेल, असे म्हणत धीर दिला.
सूचनांना केराची टोपली
कुंडमळा परिसर पर्यटनदृष्ट्या जितका सुंदर, तितकाच संवेदनशीलही आहे. पुलाच्या उभारणीला पन्नासहून अधिक वर्षे झाली आहेत. त्याचे बांधकाम जुने असून मधला भाग अजूनही लोखंडीच आहे. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास हा पूल धोकादायक ठरतो, याची जाणीव प्रशासनाला होती. त्यामुळेच आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलिस विभागाने सूचना फलक लावले होते. तरीदेखील सोशल मीडियावर ’व्हायरल’ होण्याच्या नादात या सूचनांकडे पर्यटकांनी सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.
रिल्सच्या हव्यासापोटी सुरक्षेचा विसर
दुर्घटनेपूर्वी अनेक पर्यटक ’ऍक्शन शॉट्स’, ’ग्लॅमरस पोज’ देताना दिसल्याचे नागरिक सांगतात. अनेकांनी मोबाईल हातात घेऊन फोटोसेशनही केले. एकाचवेळी पुलावर 20 ते 25 दुचाक्या आणि पुलावर 50 ते 60 लोक उभे होते. त्यावेळी एकालाही धोक्याची कल्पना आली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पूल खूप जुना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही इथे राहतोय. प्रत्येक पावसाळ्यात आम्ही पर्यटकांना सांगतो. गर्दी करू नका, जपून चालत जा, पूल धोकादायक आहे. पण ऐकणार कोण? तरुण येतात, फोटो काढतात, रिल्स करतात. त्यासाठी स्वतःच्या जीवाशी खेळतात. सोशल मीडियासाठी तरुण जीव धोक्यात का घालतात, हेच समजत नाही.
- पोपट शेलार, स्थानिक रहिवासी
येथे रोज शेकडो लोक येतात. काहीजण सकाळी येतात आणि रात्री उशीरापर्यंत थांबतात. त्यांना रात्री इथे थांबू नका, पाणी वाढते, धोका होतो, असे सांगतो. मात्र, त्यांना ऐकायचे नसते. फोटो काढायचे असतात. त्यासाठी रात्र झाली तरी पर्यटक जीवाची पर्वा करत नाहीत.
- कासाबाई शेलार, स्थानिक रहिवासी