Pune Bridge Collapse: हुल्लडबाज पर्यटक अन् बेफिकीर प्रशासनामुळे घात; जखमी झालेल्या पर्यटकांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

जखमींच्या डोळ्यांत भीती दिसत होती, त्यांचे नातेवाईकही तणावात होते
Pune Bridge Collapse
हुल्लडबाज पर्यटक अन् बेफिकीर प्रशासनामुळे घात; जखमी झालेल्या पर्यटकांनी सांगितलं नेमकं काय घडलं?Pudhari
Published on
Updated on

पुणे: पावसाळी पर्यटनाचा आनंद काही क्षणातच भीषण दुःखात परिवर्तित झाला. बेफिकीर प्रशासन आणि हुल्लडबाज पर्यटकांमुळे घटना घडली. रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या जखमींच्या डोळ्यांत भीती दिसत होती, त्यांचे नातेवाईकही तणावात होते.

दुर्घटनेनंतर घटनास्थळी मदतीसाठी स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकांनी धाव घेतली. जखमींना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी झालेल्या पर्यटकांनी आपल्या व्यथा व्यक्त करीत असताना त्यांच्या डोळ्यांत अजूनही त्या क्षणाची भीती स्पष्ट दिसत होती. (Latest Pune News)

Pune Bridge Collapse
Political News: दिल्ली माझे अंतिम लक्ष्य आहे: महादेव जानकर

श्रीकांत गरड (रा. नेवासा, अहमदनगर) म्हणाले की, मी पुलाच्या कडेला उभा होतो. अचानक पूल पडल्यामुळे मी जोरात दगडावर आपटलो आणि तोंडाला गंभीर मार लागला. मी स्वतःला सावरत वर आलो आणि नंतर मला रुग्णवाहिकेने जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

भाऊसाहेब कचरे म्हणाले की, सोशल मीडियावर बातमी समजताच आम्ही तत्काळ कुंडमळाकडे निघालो. वाटेतच फोन आला की, आमचा नातेवाईक हॉस्पिटलमध्ये आहे. मग अर्ध्या वाटेवरूनच आम्ही परत हॉस्पिटलमध्ये गेलो.

प्रथमेश देवरे (आंबी, मावळ) म्हणाले की, पुलाखाली असताना अचानक पूल कोसळला आणि एक मोठा दगड पायावर पडला. मी खाली पडलो. मदतीसाठी कोणीच नव्हते, म्हणून मी पटकन मित्राला फोन केला.

योगेश पानमंद (तळेगाव दाभाडे) यांनी सांगितले की, मित्राचा फोन येताच मी क्षणाचाही विचार न करता घटनास्थळी गेलो. मित्राला उचलून दुचाकीवर बसवले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

शंतनु निगडे यांनी सांगितले की, पूल कोसळल्यावर मी पटकन पुलावरील खांबाला पकडले आणि नंतर त्याचा आधार घेत बाजूला आलो. त्यानंतर मला अथर्व हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

शॉर्टकट म्हणून पुलाचा रस्ता धरला अन्..!

घटनेत धैर्य दाखवून वडिलांचा जीव वाचवणारे गोपाल तंवर यांनी सांगितले की, वडिलांना अचानक रक्तदाबाचा त्रास झाला होता. मी पवना हॉस्पिटलकडे निघालो होतो. शॉर्टकट म्हणून कुंडमळा रस्ता घेतला.

मात्र, पुलावर तरुणांची हुल्लडबाजी आणि गर्दी होती. मी गाडी थांबवून लोकांना बाजूला करत असतानाच पूल कोसळला. मी वडिलांना सुरक्षित बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर माझ्या खांद्याला दुखापत झाल्याने मला हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

रुग्णालयात धावपळ अन् भीतीचे वातावरण

घटनेनंतर खासगी रुग्णालयांत उपचारासाठी रुग्णांचा ओघ वाढल्याने वैद्यकीय यंत्रणा तणावाखाली काम करीत होती. जखमी रुग्णांना शोधताना नातेवाइकांची दमछाक होत होती. अनेक रुग्णवाहिका घटनास्थळावरून गेल्यामुळे नक्की आपला रुग्ण कोणत्या रुग्णालयात दाखल झाला आहे, याचा कुटुंबीयांना धावपळ करून शोध घ्यावा लागत होता.

जोवर रुग्णाचा चेहरा नातेवाईक पाहत नव्हते तोवर मात्र त्यांच्या चेहर्‍यावर चिंता आणि डोळ्यांमध्ये अश्रू ओघळत होते. सतत रुग्णवाहिकांच्या सायरनच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

Pune Bridge Collapse
Pune News: प्राध्यापक भरती प्रक्रिया तत्काळ पूर्ण करा; चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

सांगाड्याखाली अडकले पर्यटक

घटना घडताच शेलारवाडी आणि कुंडमळा येथील स्थानिक नागरिकांनी, तरुणांनी पुलाकडे धाव घेतली, काही नागरिक पाण्याखाली गेले तर काही नागरिक पुलाच्या कठड्यात अडकून पडले होते. यामध्ये दोन स्थानिक दुचाकीस्वारांचाही समावेश होता.

याबाबतची माहिती तत्काळ पोलिस प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर लगेचच पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच एनडीआरएफ चे पथक दाखल झाले आणि बचावकार्य सुरु झाले. या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून लोखंडी कठड्यात अडकलेल्या व अर्धवट पाण्यात असलेल्या एका व्यक्तीचा जीव वाचवला.

मंत्री अन् नेत्यांची भेट !

घटनेची माहिती मिळताच आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे हेही कुंडमळा बाजूने घटनास्थळी दाखल झाले आणि प्रशासकीय यंत्रणेला मदत केली. बचावकार्य सुरू असताना खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या पाठोपाठ ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील हेही घटनास्थळी दाखल झाले. संबंधित नेत्यांनी अधिकार्‍यांकडून बचावकार्याबाबत माहिती घेतली.

स्थानिक म्हणतात...बंदीच हवी होती !

पूल अत्यंत कमकुवत झाला होता. तसेच नदीपात्र अत्यंत धोकादायक आहे, त्यामुळे याठिकाणी खर तर पर्यटकांना बंदीच हवी होती, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली. अलीकडचे काळात पर्यटक खूप गर्दीव करत होते, हुल्लडबाजी करणार्‍यांची संख्या मोठी होती.

रात्री उशिरापर्यंत मुले मुली याठिकाणी अश्लील चाळे, हुल्लडबाजी, धांगडधिंगा करत असत. त्यामुळे आम्हालाही त्याचा त्रास होत होता, परंतु अशा परिस्थितीत पर्यटकांना पोलिसांनी येऊच कसे दिले असा सवालही स्थानिक नागरिकांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news