पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप प्रभागरचना तयार झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रारुप प्रभाग रचनेला मंजुरी दिल्यानंतर त्यावर 4 सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचनांसाठी मुदत देण्यात आली होती. मुदतीमध्ये शहरातून 318 हरकती व सूचना दाखल करण्यात आल्या आहेत. या हरकतींवर बुधवारी (दि. 10) चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृह येथे सुनावणी घेण्यात येणार आहे.
महापालिकेची फेबुवारी 20217 नंतर आता निवडणूक होत आहे. दिवाळीनंतर निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीबाबत माजी नगरसेवकांसह इच्छुकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांच्या पथकाने प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे तयार केले आहेत. त्याला नगर विकास विभागानंतर राज्य निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर ते प्रसिद्ध करण्यात आले. (Latest Pimpri News)
प्रभागरचना तळवडे-चिखली या भागांपासून सुरू होऊन सांगवी अशी उतरत्या क्रमाने करण्यात आली आहे. शहराची सन 2011 ची जनगणना विचारात घेऊन प्रत्येक प्रभागातील मतदार संख्या निश्चित करण्यात आली आहे. प्रभागांची रचना सन 2017 च्या निवडणुकीप्रमाणे जुनीच ठेवण्यात आली आहे. यावर शहरातील काही प्रभागांमधून हरकती दाखल करण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये सर्वाधिक हरकती संभाजीनगर, शाहूनगर या प्रभाग क्रमांक 10 मधून घेण्यात आल्या आहेत. त्याखालोखाल चिखली गावठाण प्रभाग क्रमांक 1 आणि संत तुकारामनगर, कासारवाडी, पिंपरी प्रभाग क्रमांक 20 मधून हरकती नोंदवल्या आहेत. या वेळी एक गठ्ठा हरकती स्वीकारण्यास प्रशासनाने नकार दिला. परिणामी हरकतींची संख्या कमी झाली आहे.
त्या हरकतींवर बुधवारी ऑटो क्लस्टर याठिकाणी दुपारी 1 ते 4 या वेळेत सुनावणी घेण्यात येणार आहे. राज्य शासनाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे हे सुनावणी घेणार आहेत. यावेळी हरकत घेतलेल्या नागरिकांनी आपल्या वैध ओळखपत्रासह उपस्थित राहावे. तक्रारदारांना क्रमांक देण्यात आले असून, त्यानुसार दिलेल्या वेळेत त्यांनी उपस्थित राहावे. सविस्तर वेळापत्रक महापालिकेच्या www. pcmcindia. gov. in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रभागरचना सहा ऑक्टोबरला होणार अंतिम
हरकती व सूचनांवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर नियुक्त केलेल्या अधिकारी प्रवीण दराडे यांच्याकडून त्या संदर्भातील अंतिम अहवाल नगर विकास विभागाला 13 ते 15 सप्टेंबर या कालावधीत सादर केला जाणार आहे. त्यानंतर तो अहवाल 16 ते 22 सप्टेंबर या कालावधीत राज्य निवडणूक आयोगाला सादर केला जाईल. त्यानंतर अंतिम प्रभागरचना 3 ते 6 ऑक्टोबर या कालावधीत प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार एससी, एसटी, ओबीसी व महिला आरक्षण सोडत काढली जाईल.
वेळेत सुनावणीसाठी उपस्थित राहावे
प्रारुप हरकती व सूचनांवर बुधवारी (दि.10) ऑटो क्लस्टर येथे सुनावणी पार पडणार आहे. ज्या नागरिकांनी हरकती नोंदवल्या आहेत, त्यांना सूचनापत्र पाठवण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या वेळेत हरकतीवरील सुनावणीसाठी उपस्थित राहावे, असे महापालिकेच्या निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.