सोमाटणे: घोरावाडी स्टेशन रोडलगत मरिमाता मंदिराच्या अगदी दहा फुटांवर अनधिकृत हातभट्टी दारूचा उघडपणे चालणारा व्यवसाय आता स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मंदिर परिसर हा श्रद्धा आणि शांततेचे प्रतीक असताना येथेच बेकायदेशीर दारूधंदा सुरू असल्याने भाविक, महिला आणि रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, या दारूधंद्याशी संबंधित काही लोक मंदिराच्या मागील भिंतीला टेकून उघडपणे दारूचे सेवन करत बसतात. मंदिराच्या पवित्रतेचा अनादर करणारे हे प्रकार स्थानिकांच्या भावना दुखावणारे ठरत आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अशा असभ्य दृश्यांचा सामना करावा लागत असल्याने परिसराची पवित्रता आणि वातावरण दोन्ही बाधित झाले आहे.
रात्री उशिरापर्यंत येथे गर्दी जमा होत असून, आरडाओरडा, कचरा आणि गोंधळ यामुळे रहिवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या भागातून जाणे असुरक्षित वाटत असल्याचेही समोर आले आहे. मुलांवरही याचा मानसिक परिणाम होत असल्याने पालकांची चिंता अधिक वाढली आहे.
मरिमाता मंदिर हे ग््राामस्थांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी दारूविक्री करणे किंवा मंदिराच्या आवारात बसून दारू पिणे हे योग्य नाही. तरी पोलिस प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून दारूविक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. अन्यथा येत्या काही दिवसांत स्थानिक नागरिकांकडून याची दखल घेऊन उपाययोजना केली जाईल.विनोद भेगडे, सामाजिक कार्यकर्ते.
यासंबंधी माहिती मिळताच पथक पाठवून कारवाई करण्यात आली आहे. जो काही दारूसाठा होता तो जप्त करण्यात आला आहे. येथून पुढील काळात पुन्हा आशा प्रकारे दारूविक्री करताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी निर्धास्त राहवे. तसेच पुढील काळात असे आढळून आल्यास त्वरित पोलिस प्रशासनाला कळवावे.कन्हैया थोरात, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन.