Gas Shortage Pudhari
पिंपरी चिंचवड

Commercial Gas Shortage: गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय संकटात; नवलाख उंबरेत गंभीर स्थिती

सिलिंडरअभावी हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर; विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही फटका

पुढारी वृत्तसेवा

नवलाख उंबरे: अमेरिका-इराण युद्धामुळे शासनाने व्यावसायिक गॅस सिलिंडर देणे बंद केल्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट तसेच लहान-मोठ्या खानावळींसमोर व्यवसायिकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. गॅस टंचाईमुळे व्यावसायिकांसह नागरिकही हवालदिल झाले असून, दैनंदिन जीवनावर याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. परिसरातील अनेक हॉटेल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

परिसरात 25 हून अधिक हॉटेल्स

नवलाख उंबरे परिसरात सुमारे 25 हून अधिक हॉटेल्स कार्यरत आहेत. तर, चहा विक्रेते, नाश्ता सेंटर, भोजनालय आणि लहान खानावळींची संख्या 100 ते 150 पेक्षा अधिक आहे. या सर्व व्यवसायांना दररोज 2 ते 5 व्यावसायिक गॅस सिलिंडरची आवश्यकता असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नवीन गॅस बुकिंग पूर्णपणे बंद करण्यात आल्याने व्यवसायिकांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

हॉटेल चालविणे झाले अवघड

गॅसचा साठा संपत आल्याने अनेक हॉटेल चालकांनी पर्याय म्हणून कोळसा शेगडी, लाकूड आणि इलेक्ट्रिक शेगडींचा वापर सुरू केला आहे. काही ठिकाणी डिझेलवर चालणाऱ्या भट्ट्यांचाही वापर केला जात आहे. मात्र, या पर्यायांमुळे खर्च वाढत असून, पर्यावरणावरही परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे बरेचसे व्यावसायिक हे भाडेतत्त्वावर असल्यामुळे त्यांना चूल आणि भट्टी पेटवणे शक्य होत नसल्याने त्यांना बंद किंवा हॉटेल व्यवसाय दुसरीकडे हलविण्याची वेळ आली आहे.

विद्यार्थ्यांना फटका

या परिस्थितीचा सर्वांधिक फटका बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थी आणि नोकरदारांना बसत आहे. अनेक मेस आणि पोळी-भाजी केंद्रांमध्ये जेवणाची उपलब्धता कमी झाली असून, काही ठिकाणी दरही वाढले आहेत.दरम्यान, गॅस टंचाईमुळे कोळसा आणि सरपणाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. एकूणच, व्यावसायिक गॅसच्या टंचाईमुळे शहरातील खाद्यव्यवसायावर गंभीर परिणाम झाला असून, प्रशासनाने तातडीने यावर तोडगा काढण्याची मागणी व्यावसायिकांकडून केली जात आहे. अन्यथा, येत्या काही दिवसांत अनेक हॉटेल्स आणि खानावळी बंद पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गॅस सिलिंडर टंचाईमुळे आमचा व्यवसाय पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. कोळसा आणि लाकूड वापरल्याने वेळ जास्त लागतो आणि ग्राहकांनाही सेवा उशिरा मिळते. दररोजच्या जेवणासाठी गॅस सिलिंडर अत्यावश्यक आहे. आता काही पदार्थ कमी करावे लागत आहे.
अविनाश नाटक, हॉटेल व्यावसायिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT