पिंपरी: गणेशोत्सवासाठी शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नदीकाठावरील विर्सजन घाटावर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कृत्रिम जलकुंड उभारण्यात आले आहेत. त्यात नागरिकांना मूर्तीचे विसर्जन करता येणार आहे.
तसेच, निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्या कुंड ठेवण्यात आले आहेत. त्यात भाविकांनी हार, फुले, माळा, पूजा साहित्य आदी साहित्य टाकावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. नदी पात्रात मूर्ती विसर्जन तसेच, निर्माल्य न टाकण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
विसर्जन सोहळ्यामुळे शहरातील नदीकाठ, तलाव व कृत्रिम जलकुंडांवर भाविकांची मोठी गर्दी होते. मात्र, या काळात अनेकदा प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोल, सजावटीचे साहित्य व इतर विघटन न होणारा कचरा थेट पाण्यात किंवा नदीकाठावर टाकला जातो. यामुळे जलप्रदूषण होते.
नदीकाठावर कुठल्याही प्रकारचा प्लास्टिक कचरा किंवा विघटन न होणारे साहित्य टाकू नये. यासाठी प्रत्येक विसर्जन स्थळी निर्माल्य संकलनासाठी विशेष कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. फुले, माळा, पूजेचे साहित्य व इतर जैविक कचरा कुंड्यांमध्ये टाकावा. कुंड्यांमधून गोळा केलेले साहित्य योग्य प्रकारे खत किंवा इतर पर्यावरणपूरक उपयोगासाठी वापरता येते. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होऊ शकतो, असे आवाहन आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे
शहरातील विविध भागांत कृत्रिम जलकुंडांची सोय केली आहे. भाविकांनी विसर्जनासाठी त्यांचा उपयोग करावा. थर्माकोल वा प्लास्टिकच्या सजावटीच्या वस्तूऐवजी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा , असेही आवाहन पवार यांनी केले आहे.