

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रारुप प्रभागरचना प्रसिद्ध झाली आहे. त्यावर 4 सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्यात येत आहेत. निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची निश्चिती करणे. त्यासाठी सोयी सुविधा पुरविण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकार्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार ते 32 प्रभागात आवश्यकतेनुसार मतदान केंद्र निश्चित करणार आहेत. एका मतदान केंद्रात 700 ते 800 मतदार असणार आहेत. (Latest Pimpri News)
राज्य निवडणूक आयोगाच्या 26 जून 2025च्या आदेशनुसार महापालिका प्रशासनाने महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रारुप प्रभागरचना तयार करून शुक्रवारी (दि.22) प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर प्रशासनाला हरकती प्राप्त होत आहेत.
तसेच, निवडणुकीसाठी मतदानप्रक्रियेसाठी मतदान केंद्र तयार करण्यास प्रशासनाने सुरूवात केली आहे. प्रभागाच्या मतदार संख्येनुसार मतदान केंद्रांची जागा निश्चित करणे. मतदान केंद्रासाठी सोई-सुविधा पुरविण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकार्यांवर सोपविण्यात आली आहे. क्षेत्रीय अधिकारी हे पदनिर्देशित अधिकारी असणार आहेत. क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे (अ क्षेत्रीय कार्यालय), अश्विनी गायकवाड (ब), अजिंक्य येळे (क), अमित पंडीत (ड), तानाजी नरळे (ई), अतुल पाटील (फ), किशोर ननावरे (ग) आणि पूजा दुधनाळे (ह क्षेत्रीय कार्यालय) यांच्याकडे त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत असलेल्या प्रभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
त्या कामकाजासाठी क्षेत्रीय अधिकार्यांना एका प्रभागासाठी प्रत्येकी दोन कार्यकारी अभियंते देण्यात आले आहेत. ते सहाय्यक पदनिर्देशित अधिकारी असतील. एका मतदान केंद्रावर 700 ते 800 मतदारसंख्या असणार आहे. ती संख्या लक्षात घेऊन तात्काळ कार्यवाही करण्याबाबत क्षेत्रीय अधिकार्यांना आदेश देण्यात आले आहेत, असे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले. एकूण 2 हजार 300 मतदान केंद्र असणार शहराची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार 17 लाख 27 हजार 692 आहे.
सन 2025 ची मतदार संख्या तितकीच अपेक्षित धरून मतदान केंद्र निश्चित करण्याचे नियोजन केले जाणार आहे. फेब्रुवारी 2017 च्या निवडणुकीत 1 हजार 608 मतदान केंद्र होती. मतदार संख्या वाढल्याने यंदाच्या निवडणुकीसाठी 2 हजार 300 मतदान केंद्र करावी लागणार आहेत. गेल्या वेळेच्या तुलनेत यंदा मतदान केंद्रांची संख्या 692 ने वाढणार आहे. प्रत्येक प्रभागासाठी एक सेक्टर ऑफिसर असणार आहे.
आता नेमलेला सेक्टर ऑफिसर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदलता येणार नाही. सेक्टर ऑफिसर मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करून क्षेत्रीय अधिकार्यांना अहवाल देतील. मतदान केंद्र निश्चित करण्याचे कामकाज येत्या 15 दिवसांत पूर्ण करावे, असे आदेश आयुक्त तथा प्रशासक तथा निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह यांनी क्षेत्रीय अधिकार्यांना दिले आहेत.