नवलाख उंबरे: दिवाळी सण जवळ आल्याने बाजारपेठेत विद्युत रोषणाईचा झगमगाट झाला आहे. बाजारपेठेत पारंपरिक पणतीपेक्षा नागरिकांनी इलेक्ट्रिक पणतीला पसंती दिल्याचे दिसून येत आहे. पारंपरिक मातीच्या पणत्यांसोबतच यावर्षी इलेक्ट्रिक पणत्या आणि एलईडी दिव्यांचीही जोरदार मागणी दिसून येत आहे. रंगीत प्रकाश, आकर्षक डिझाईन्स आणि कमी विजेचा वापर या वैशिष्ट्यांमुळे ग्राहक या आधुनिक पणत्यांकडे आकर्षित होत आहेत. (Latest Pimpri chinchwad News)
लहान आकाराच्या बॅटरीवर चालणाऱ्या पणत्या, संगीतासह प्रकाश बदलणाऱ्या एलईडी पणत्या, तसेच सौरऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक पणत्या अशा विविध प्रकारच्या उत्पादनांनी बाजारपेठ सजली आहे. या आधुनिक पणत्या पारंपरिकतेला आधुनिकतेचा स्पर्श देत घरगुती सजावटीसाठी खास ठरत आहेत.
बाजारात पारंपरिक मातीच्या पणत्यांबरोबर इलेक्ट्रिक दिव्यांचा संगम दिसत असून, सणासुदीचा माहोल अधिक रंगतदार झाला आहे. टिकाऊपणा, सुरक्षितता आणि पुन्हा वापरता येण्याची सोय या कारणांमुळे इलेक्ट्रिक पणत्या केवळ शहरीच नव्हे, तर ग्रामीण भागातही लोकप्रिय ठरत आहेत. दिवाळीच्या सजावटीत पारंपरिक प्रकाशाच्या तेजाला आधुनिक इलेक्ट्रिक रोषणाईची जोड मिळाल्याने यंदाची सणसुदी अधिक झगमगती होणार आहे.
दरवर्षी दिवाळीच्या सणात ग्राहक मातीच्या पणत्या घेत असत, पण यंदा इलेक्ट्रिक पणत्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. या पणत्या पुन्हा वापरता येतात, त्यामुळे ग्राहकांना त्यात फायदा वाटतो. शिवाय एलईडी लाईट्समुळे दिवे अधिक आकर्षक दिसतात. एकच सेट वर्षानुवर्षे वापरता येतो, त्यामुळे लोक पारंपरिक पणत्यांसोबत आधुनिक इलेक्ट्रिक पणत्यांकडे वळत आहेत.नितीन दगडे, विक्रेते