

वडगाव मावळ: तळेगाव दाभाडे नगर परिषदेची नवीन इमारतीचे लोकार्पण तसेच शिवशंभू स्मारकाचे उद्घाटन व मावळ तालुक्यातील 761 कोटी 17 लक्ष रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली. (Latest Pimpri chinchwad News)
या वेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री मदन बाफना, संजय भेगडे, माजी आमदार रुपलेखा ढोरे, तसेच ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, बापूसाहेब भेगडे, बबनराव भेगडे, स्वाभिमानी रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, अंजलीराजे दाभाडे, सत्येंद्रराजे दाभाडे आदी उपस्थित राहणार आहेत.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या या वास्तूमध्ये पहिल्या मजल्यावर कर, पाणीपुरवठा, स्वच्छता, विद्युत आणि अग्निशमन विभागांचे कार्यालय असणार आहे. दुसऱ्या मजल्यावर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष कक्ष आणि कॉन्फरन्स हॉल, तर तिसऱ्या मजल्यावर बांधकाम, नगररचना, लेखा आणि मुख्याधिकारी कक्ष असेल. चौथ्या मजल्यावर संगणक विभाग, शिक्षण विभाग, पंचकोनी डुप्लेक्स सभागृह आणि पत्रकार बाल्कनीचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली.
या सोहळ्यात 77 कोटी 54 लाख रुपयांच्या लोकार्पण कामांसह 683 कोटी 63 लाख रुपयांच्या भूमिपूजन कामांचा शुभारंभ होणार आहे. शिवशंभू स्मारकाचे लोकार्पण करून 1 लक्ष वृक्षलागवड शुभारंभ करण्यात येणार आहे.