Ekveera Devi Pudhari
पिंपरी चिंचवड

Ekveera Devi Navratri 2026: आई एकवीरा देवीच्या नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण; दुर्गाष्टमी, महानवमीला २४ तास दर्शन

११ ऑक्टोबरपासून उत्सवाला प्रारंभ; दररोज पहाटे ४ ते रात्री ११ पर्यंत मंदिर खुले, भाविकांसाठी विशेष व्यवस्था

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला वेहेरगाव गडावरील आई एकवीरा देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी नवरात्रोत्सवात दररोज पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. तर, शेवटचे दोन दिवस अर्थात दुर्गाष्टमी व महानवमीच्या दिवशी २४ तास मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

शारदीय नवरात्रोत्सवामध्ये आईचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक वेगवेगळ्या भागातून येत असतात. येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी व त्यांच्या सुलभ दर्शनासाठी श्री एकवीरा देवस्थान ट्रस्ट सज्ज आहे. आई एकवीरा देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारपासून (दि. ११) सुरुवात होणार आहे.

घटस्थापनेच्या दिवशी रविवार असल्यामुळे या दिवशी गडावर मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पहाटे देवीचा अभिषेक व पूजा, आरती करून घटस्थापना विश्वस्त मंडळाच्या हस्ते केली जाणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी ललित पंचमी, १८ ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन, १९ ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी व २० ऑक्टोबर रोजी पहाटे महानवमी होम हे महत्त्वाचे दिवस असणार आहेत. यानिमित्त भाविकांची गडावर गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे विशेष नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी दिली.

आठ दिवस होणार सप्तशृंगी स्तोत्राचे वाचन

गडावर व पार्किंगच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे. रेलिंगमध्ये उभ्या राहणाऱ्या भाविकांसाठी पंखे व पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी व सर्व सदस्य हे नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये भाविकांच्या स्वागतासाठी व त्यांच्या दर्शना सेवेसाठी गडावर उपस्थित असणार आहेत. नवरात्रोत्सवामध्ये मंदिर परिसरात सप्तशृंगी स्तोत्रचे वाचन आठ दिवस केले जाणार आहे. मंदिर परिसर हा सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या निग्रहाणीखाली ठेवण्यात आला आहे. खासदार व श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सुरेश म्हात्रे, श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, वरिष्ठ उपाध्यक्ष मारुती देशमुख, उपाध्यक्ष सागर देवकर, सचिव नवनाथ देशमुख, सहसचिव महेंद्र देशमुख, खजिनदार व पुजारी संजय गोविलकर, सहखजिनदार विकास पडवळ, विश्वस्त अर्चना देवकर यांसह विश्वस्त मंडळ भाविकांच्या सुलभदर्शनासाठी कार्यरत आहे.

स्ट्रीट लाईटचे काम पूर्ण

आई एकवीरा देवीच्या गडावर विविध विकासकामे सुरू आहेत. कार्लाफाटा ते गड पायथ्यापर्यंत स्ट्रीट लाईट सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रात्री व पहाटे प्रवास करणाऱ्या भाविकांना सुखकर होणार आहे. गडावर पायथा ते पार्किंग दरम्यानच्या पायऱ्यांचे काम झाले असून, पुढील काम अद्याप शिल्लक असले तरी भाविकांना गडावर जाण्यासाठी व खाली येण्यासाठी विनाअडथळा प्रवास करता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT