Book  Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Illegal School Book Sale: शाळेत बेकायदेशीर पुस्तकविक्रीवर छापा; खासगी प्रकाशनाची पुस्तके जप्त

पालकांवर जबरदस्तीने खरेदीचा आरोप; गणवेश व साहित्यही महाग दराने विक्री होत असल्याचे उघड

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: शालेय पुस्तकांची बेकायदेशीर विक्रीची माहिती मिळाल्यानंतर शिक्षण विभागाच्या पथकाने चऱ्होलीतील चोवीसावाडी येथील रेड क्लिप शाळेत छापा मारला. या कारवाईत शाळेच्या आवारातून खासगी प्रकाशकांची अनधिकृत पुस्तके जप्त करण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळा प्रशासन पालकांना एनसीईआरटीच्या प्रकाशनाऐवजी खासगी प्रकाशित पुस्तके, शालेय गणवेश आणि साहित्य खरेदी करण्याचा दबाव आणत होते. ही पुस्तके शाळेमध्येच विकली जात होती. जप्त केलेल्या पुस्तकांची यादी तयार करून पुढील चौकशी करण्यात येणार आहे. याबाबत शाळेचे प्रादेशिक व्यवस्थापक रविकांत पवार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास टाळले.

शालेय शिक्षण विभागाचा नियम काय सांगतो शाळा कोणत्याही खासगी प्रकाशकाची पुस्तके विकू शकत नाहीत पालकांवर विशिष्ट दुकानातूनच पुस्तके घेण्याची सक्ती करता येत नाही नियमभंग केल्यास शाळेची मान्यता रद्द करण्याची तरतूद आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या नियमानुसार शाळा कोणत्याही खासगी पुस्तकांची विक्री करू शकत नाहीत किंवा पालकांवर विशिष्ट दुकानातून खरेदीची सक्ती करू शकत नाहीत. शाळेच्या नावाने बेकायदेशीर पुस्तक विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. ही पुस्तके ऑनलाईन मागविली जातात. सध्या सर्व पुस्तके व गणवेश जप्त केली आहेत.
संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, महापालिका
शालेय प्रशासनाकडून एनसीआरटीची पुस्तके म्हणून आर स्माईल नावाच्या प्रकाशनाची पुस्तके विकली जात होती. त्याबरोबर शैक्षणिक साहित्य, गणवेश, बूट विकत होते. शाळेचे गणवेश जे ५०० रुपयांना मिळतात ते १८०० ते २००० रुपयांपर्यंत विकले जात होते. यापूर्वीदेखील आम्ही तक्रार केली होत;. पण त्या वेळी त्यांनी साहित्य टॉयलेटमध्ये लपविले होते. आता शिक्षण विभागाने कारवाई केल्यामुळे सर्व गोष्टी उघड झाल्या आहेत.
गिरीश जाधव, उपाध्यक्ष, पालक शिक्षक संघ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT