Children Selling Brooms During Diwali Pudhari
पिंपरी चिंचवड

Children Selling Brooms During Diwali: दिवाळीच्या झगमगाटात चिमुकल्यांच्या हातात केरसुणी; बालपण हरवल्याचे वास्तव

खरेदीच्या उत्साहात रस्त्यावर केरसुणी विकणारी मुले; शिक्षण, सुरक्षित बालपण आणि सामाजिक बांधिलकीचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

रावेत: दिवाळी म्हटले की आनंद, उत्साह, रोषणाई, नवीन कपडे, फराळ आणि खरेदीची लगबग... सध्या बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. माहेरवाशीण मुलींच्या खरेदीचा उत्साह असो, नववधूची सणासाठीची तयारी असो किंवा नातवाच्या हट्टासाठी आजोबांची सुरू असलेली धावपळ असो, प्रत्येकजण आपापल्या परीने दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, याच उत्साहाच्या वातावरणात रस्त्याच्या कडेला केरसुणी विकणाऱ्या लहान मुलांचे चित्र मनाला चटका लावणारे ठरत आहे.

एका बाजूला दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी, दुकानांमध्ये सुरू असलेली उलाढाल आणि सणासाठी होणारी आर्थिक तयारी दिसत असताना दुसरीकडे काही चिमुकली मुले हातात केरसुणी घेऊन रस्त्यावर उभी आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना केरसुणी खरेदी करण्याची विनंती करत ही मुले दिवसभर विक्रीसाठी प्रयत्न करताना दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर बालपणाचा निरागसपणा असला, तरी परिस्थितीने त्यांच्या हातात खेळण्यांऐवजी उदरनिर्वाहाचे साधन दिल्याचे चित्र दिसून येते.

दिवाळीच्या काळात प्रत्येक घरात स्वच्छतेला विशेष महत्त्व असते. घराची साफसफाई, रंगरंगोटी आणि सजावटीसाठी नागरिकांची लगबग सुरू असते. केरसुणीला तर लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे, सुख-समृद्धी नांदावी, या भावनेतून नागरिक केरसुणीची खरेदी करतात. मात्र, त्याच केरसुणीची विक्री करणाऱ्या या चिमुकल्यांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणि आनंदाचे दिवस कधी येणार, असा प्रश्न उपस्थित होतो.

दिवाळीत घराघरांत लक्ष्मीपूजन होईल, अंगणात पणत्या उजळतील आणि आकाशात फटाक्यांची आतषबाजी होईल. मात्र, रस्त्यावर उभ्या असलेल्या या चिमुकल्यांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी समाजानेही एक पणती पेटवण्याची गरज आहे. सरस्वती प्रसन्न झाली की या बालकांच्या आयुष्यातही लक्ष्मीचे आगमन होऊ शकते; मात्र या विचाराला प्रत्यक्ष कृतीचे स्वरूप कधी येणार, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.

दिवाळीचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचतोय का?

दिवाळी हा केवळ श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याचा सण नसून आनंद, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा उत्सव आहे. बाजारपेठेत हजारो रुपयांची खरेदी करणाऱ्या नागरिकांनी अशा लहान विक्रेत्यांकडूनही वस्तू खरेदी केल्यास त्यांच्या कुटुंबाला हातभार लागू शकतो. मात्र, या मुलांच्या परिस्थितीकडे केवळ सहानुभूतीच्या नजरेने पाहून प्रश्न सुटणार नाही. त्यांना शिक्षणाची संधी, योग्य मार्गदर्शन आणि सुरक्षित बालपण मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

सरस्वतीचा आशीर्वाद मिळाला, तर लक्ष्मीही प्रसन्न होईल!

शिक्षण हेच गरिबी आणि परिस्थितीच्या चक्रातून बाहेर पडण्याचे प्रभावी माध्यम आहे. या बालकांच्या हातात केरसुणीऐवजी पुस्तके, पाटी आणि लेखणी असावी, त्यांच्या आयुष्यातही शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीचे दरवाजे खुले व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची गरज आहे. बालकांना शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या परिस्थितीचा शोध घेऊन त्यांना शाळेशी जोडणे, त्यांच्या कुटुंबांना शासकीय योजनांची माहिती देणे आणि बालकामगार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT