उंबरे: दिवाळी म्हटली की घराघरात साफसफाई, रंगरंगोटी आणि सजावट यांचा उत्साह दिसतो. मात्र, या सणातील सर्वांत महत्त्वाचा आणि प्रतीकात्मक भाग म्हणजे केरसुणी. लक्ष्मी पूजनाच्या पूर्वसंध्येला घरात आणि दुकानात केली जाणारी पारंपरिक झाडाझडती. आधुनिक युगात जरी व्हॅक्युम क्लीनर, मॉप्स आणि विविध क्लिनिंग उपकरणांनी बाजारपेठ व्यापली असली, तरी केरसुणीचे महत्त्व मात्र आजही कायम असल्याचे दिसत आहे. नवलाख उंबरे बाजारपेठेत सोमवारी केरसुणी खरेदीसाठी गर्दी झाली होती. (Latest Pimpri chinchwad News)
ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना
दिवाळीपूर्वी घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ करण्याची परंपरा ही केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नाही, तर, ती आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाची आहे. असे मानले जाते की लक्ष्मीदेवी स्वच्छ, पवित्र आणि सुवासिक ठिकाणीच वास करते. त्यामुळे घरातील नकारात्मकता आणि दारिद्य्राचे प्रतीक असलेली धूळ, कोळीचे जाळे आणि अनावश्यक वस्तू केरसुणीच्या माध्यमातून दूर करून शुभशक्तींना आमंत्रण दिले जाते. वास्तुशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र या दोन्ही दृष्टींनीही या परंपरेला विशेष स्थान आहे. केरसुणी ही साध्या झाडांच्या देठांपासून बनविली जाते आणि ती पूर्णतः नैसर्गिक असते. त्यामुळे प्लास्टिकसारखे प्रदूषण तिच्यात होत नाही. ग्रामीण भागात आजही महिला स्वतः केरसुणी तयार करतात आणि त्याद्वारे स्वावलंबन टिकवतात. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते.
ग्रामीण भागात केरसुणीला महत्त्व
अनेक ज्योतिष आणि अध्यात्म जाणकारांच्या मते, केरसुणी ही केवळ सफाईचे साधन नसून ती ऊर्जेचे प्रतीक आहे. तिच्या प्रत्येक झाडाला घरातील नकारात्मक उर्जा शोषण्याची क्षमता असते, असे मानले जाते. म्हणूनच लक्ष्मी पूजनाच्या आधी नव्या केरसुणीने घर झाडणे ही शुभ मानली जाते.
आजच्या आधुनिक काळातही, जेव्हा अनेक पारंपरिक वस्तू आणि सवयी विस्मृतीत जात आहेत, तेव्हा केरसुणीने आपले अस्तित्व टिकवले आहे. ही केवळ स्वच्छतेची नाही तर संस्कार, श्रद्धा आणि भारतीय परंपरेची जपणूक करणारी निशाणी आहे. म्हणूनच दिवाळी कितीही आधुनिक पद्धतीने साजरी झाली, तरी प्रत्येक घरात केरसुणीला असलेले स्थान आणि तिचा आदर आजही अबाधित आहे.
जरी बाजारात आधुनिक पद्धतीने सफाई साधने आली असली तरी दिवाळीत पारंपरिक केरसुणीला नेहमीच मागणी असते. नागरिक श्रद्धेने केरसुणी विकत घेतात आणि लक्ष्मीपूजनाच्या आधी ती वापरतात.समाधान शिंदे, स्थानिक दुकानदार