पिंपरी: दिवाळीसाठी बाजारामध्ये पारंपरिक आकाश कंदिलाबरोबर यंदा पैठणी, खण, जरीच्या काठ असलेल्या आकाश कंदिलाचा झगमगाट पहायला मिळत आहे. याबरोबरच छोट्या आकारातील आकाश कंदिलामध्येदेखील विविध प्रकार पहायला मिळत आहेत.
दिवाळी म्हटली, की नवीन कपडे, फटाके याचबरोबर दारासमोर लावण्यासाठी आकाश कंदिल हवाच असतो. त्यामुळे अधिकाधिक चांगला, वेगळा आणि आकर्षक आकाश कंदिलाचा शोध नागरिक घेत असतात.
बाजारात विविध प्रकारचे आकाश कंदिल विक्रीस आले आहेत. यामध्ये पुठ्ठा, कागद, फॅब्रिक्स, प्लायवूड, प्लास्टिकच्या व बांबूच्या टोपल्यांचा कौशल्याने वापर करून ते तयार केले आहेत.
थोर पुरुष, संत, देवांचे फोटो असलेले आकाश कंदिल उपलब्ध आहेत. महापुरुषांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे तसेच स्वामी समर्थ, श्रीराम, विठ्ठल यांचे चित्र असलेल्या आकाश कंदिलांना मोठी मागणी आहे.
हातमागाच्या पैठणी आकाश कंदिलाची धूम
दरवर्षी बाजारात प्लास्टिक कंदिलांचा सुळसुळाट असतो; पण यंदा चित्र बदलले आहे. ग्राहक पुन्हा एकदा आपल्या पारंपरिक पैठणी आणि खणाच्या आकाश कंदिलांकडे वळले आहेत. शहरातील बाजारपेठेत सध्या अशा रंगीबेरंगी कंदिलांनी दुकाने सजली आहेत. खासकरून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या कंदिलांना प्रचंड मागणी आहे. हे आकाशकंदिल १५०० रुपयांपासून मिळतात.
काय आहे वैशिष्ट्य?
हा कंदिल कागदाचा नाही, तर अस्सल पैठणी, खण आणि ब्रोकेड कापडापासून बनवलेला आहे. यावर महाराष्ट्राची ओळख असलेली पोपट, मोर, कमळ अशी पारंपरिक नक्षी आहे. काही कंदिलांवर मोत्याची नथ आणि झुमके लावलेले आहेत.
खाली लटकणारी लांब, रंगीत रेशमी झालर हे याचे मुख्य आकर्षण आहे. लाईट लागल्यावर ही झालर अतिशय सुंदर दिसते. एकदा घेतला की ४ ते ५ वर्ष तो सहज टिकतो. तसेच, यामध्ये असलेल्या सोनेरी धाग्यांच्या विणकामामुळे यामध्ये लाईट नसली यातून झगमगाट निर्माण होतो.
मिनी आकाश कंदिल
बाजारात बाल्कनीत किंवा घरासमोर लावण्यासाठी मोठा कंदिल उपलब्ध आहे. तसेच, ८ ते १२ कंदिलांचा सेटही मिळतो, जो बाल्कनीत एका रांगेत लावल्यावर अत्यंत आकर्षक दिसतो. बाजारात सजावटीसाठी रंगीबेरंगी एलईडी लाईट्सही उपलब्ध आहेत.
याची किमत १०० रुपयांपासून पुढे आहे. यामध्ये कागदी, जिलेटिनच्या कागदापासून आणि पैठणी, खण यापासून बनविलेले आकाश कंदिलांना जास्त मागणी आहे. दिवाळीसाठी विद्युत माळाबरोबर सजावटीसाठी हा चांगला पर्याय आहे. पैठणी प्रकारातील आकाश कंदिल हे ७५० रुपये डझन आहेत.
हंडी आकाश कंदिल प्रकारात फ्लोरोसंट हंडी, मेटॉलिक हंडी हे प्रकार उपलब्ध आहे. रंगीबेरंगी कापडी व कागदी कंदिल, हॅलोजन कंदिल, मार्बल पेपर कंदिल, वेताचा वापर केलेले कंदिल, फोल्डिंगचे कंदिल, मेटल स्टार, लोटस, फायरबॉल, झगमगते आकाश कंदिल बाजारात विक्रीसाठी आले आहेत.
विविध प्रकारच्या कलाकृतीचे, रचनात्मक आकाराचे आकाश कंदिल खरेदी करताा ग्राहक दिसतात. घुमट, चौकोनी, गोलाकार, दिवा, चांदणी, बॉल, पॅराशूट आदी प्रकारांमध्ये ते मिळतात. बांबूपासून तयार केलेले आकर्षक आकाश कंदिल बाजारात विक्रीसाठी आले आहेत.
थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर टाळून केलेल्या पारंपरिक व पर्यावरणपूरक आकाश कंदिल खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसत आहे. वेगवेगळ्या रंगातील आणि विविध आकारातील आकाश कंदिलांना मागणी वाढत आहे. छोटे-छोटे आकाश कंदील डझनावर मिळत असून, दहा रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यंत याची किंमत आहे.
नावीन्यपूर्ण मायक्रॉन, बांबूच्या काड्यांचे आकाश कंदिल
कागद आणि कापडाबरोबरच मायक्रॉन आणि बांबूच्या काड्यांपासून बनविलेले आकाश कंदिल हे वेगळेपणा जपत आहेत. मायक्रॉनच्या रंगबेरंगी धाग्यापासून सुरेख विणकाम केलेले आकाश कंदिल लक्षवेधी ठरत आहेत, तर बांबूच्या काड्यापासून तयार केलेले आकाश कंदिल खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल आहे.
पारंपरिक षटकोनी आकारातील आकाश कंदिललाही मागणी
बाजारात पारंपरिक षटकोनी आकाराचे लहान आणि मोठे आकाश कंदिलदेखील उपलब्ध आहेत. या आकाश कंदिलची रचना खूप जुन्या काळातील असले तरी आजही त्यामध्ये आलेल्या नावीन्यामुळे ग्राहाकांच्या पसंतीस उतरत आहेत. हे आकाश कंदिल १०० ते १००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. रंगरंबेरंगी कागद, जिलेटीन पेपरपासून तयार केलेल्या या आकाश कंदिलावर पैठणी आणि खण कापडाची छाप उठून दिसून येते.