भोसरी: दिघी येथे मोकाट जनावरांचा रस्त्यावरील वावर दिवसेंदिवस वाढतच आहे. परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर मोकाट जनावरांमुळे नागरिक व वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. परिणामी या मोकाट जनावरांमुळे रस्त्यांवरील वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच डोक्यावर अपघाताची टांगती तलवार असते. पालिकेच्या संबंधित विभागाने नागरिकांच्या या समस्येपासून सुटका करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
दिघी परिसरातील नागरिक अनेक दिवसांपासून या समस्याने त्रस्त आहेत. परांडेनगर व परिसरात मोकाट जनावरांचा नाहक सामना करावा लागत आहे. मोकाट जनावरे येथील रस्त्यांवर बिनधास्तपणे बसलेली असतात. दररोज या भटक्या प्राण्यांमुळे परिसरातील नागरिक, वाहनचालक व चाकरमानी त्रासलेल्या आहेत.
त्यात भर की काय येथील रस्त्यावर उभी, आडवी मोकाट जनावरे आणखीच भर घालत आहेत. जनावराच्या मलमूत्रामुळे परिसराला अस्वच्छतेचे स्वरूप निर्माण झाले आहे. या मलमुत्रामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. तसेच दुचाकी वाहनांनाही अपघाताचा घटना घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वाहतूक कोंडीत पडतेय भर
परिसरातील अंतर्गत रस्त्यवर मोकाट जनावरांमुळे दररोज वाहतूक कोंडीत भर पडत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. येथील नागरिक, चाकरमानी तसेच वाहनचालक दररोजच्या कोंडीला त्रासलेले आहेत. त्यात मोकाट जनावरांनी देखील वाहतूक कोंडी आणखी भर घालत आहेत. या परिसरामधून ये जा करणारे वाहनचालक या मोकाट जनावरांमुळे हैराण झाले आहेत.
मोकाट जनावरे येथील मुख्य रस्त्यावर बसलेली असल्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी तर जनावरे रस्त्याच्या मधोमध उभी व बसलेली असतात. यामुळे रस्त्यावर वाहनचलकाना सर्कस करावी लागत आहे. रस्त्याचा मधोमध उभी असलेली जनावरे अनेक वेळा वाहनाची धडक लागल्याने जखमी झाले आहेत. पालिका प्रशासनाने भटक्या जनावरांचा जाचातून मुक्तता करावी, अशी मागणी जोर धरत आहे.