देहूरोड : कॅन्टोन्मेंट हद्दीतील गणेश चाळ भागात असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सार्वजनिक शौचालयाच्या मैलाटाकीत गायीचा अपघाताने पडल्याचा प्रकार घडला. स्थानिक महिलांच्या सतर्कतेमुळे व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने त्या गायीचा जीव वाचविण्यात यश आले. मात्र, या प्रकारामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ढिसाळ कारभारावर संतापाचा सूर उमटत आहे.(Latest Pimpri chinchwad News)
गाय टाकीत पडल्याचे लक्षात येताच, घटनास्थळी पोलिस कर्मचारी आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते तातडीने दाखल झाले. जेसीबी मशीनच्या मदतीने गायीला टाकीतून बाहेर काढण्यात आले. यानंतर गायीला स्वच्छ पाण्याने धुऊन, प्राथमिक उपचार करण्यात आले. बजरंग दलाचे उपाध्यक्ष उमेश मराठे यांनी सांगितले की, गाय सुरक्षित असून तिची वैद्यकीय तपासणी करून तिला शिरीष महाराज ट्रस्ट, भोसरी येथील गोशाळेत हलवण्यात येणार आहे. या मोहिमेत प्रथमेश रामचरण, विकास शहा, मयूर चव्हाण, यश जैन आदी कार्यकर्त्यांनी विशेष मदत केली.
जुने शौचालय, उघड्या मैलाटाकीचा धोका
गणेश चाळ भागात असलेल्या शौचालयाच्या बाजूलाच एक जुनी मैलाटाकी आहे. अनेक दिवसांपासून साफसफाई न झाल्याने त्या परिसरात गवत व झुडपे वाढली आहेत. त्यामुळे टाकी पूर्णपणे झाकली गेली असून, ती नजरेसही येत नाही. याचमुळे ही घटना घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पाच ते सहा फूट खोल असलेल्या मैलाटाकीत गाय अडकून जोरात ओरडू लागल्याने आजूबाजूच्या महिलांचे लक्ष वेधले गेले. योग्य वेळी लक्ष न गेल्यास मोठा अनर्थ झाला असता, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.
जर एखादी महिला, बालक पडले असते तर?
या प्रकारानंतर कॅन्टोन्मेंटच्या कारभाराविषयी नागरिकांमध्ये तीव नाराजी निर्माण झाली आहे. त्या भागातील अनधिकृत व जुनी शौचालये, उघड्या टाक्या व झाडाझुडपांची विल्हेवाट लावण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप होत आहे. आज गाय पडली, उद्या एखादे लहान मूल किंवा महिला या भगदाडात पडली असती तर त्या वेळी जबाबदारी कोण घेणार. एखादा बळी गेल्यावरच अधिकारी जागे होणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.