देहूगाव: जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मार्ग असलेल्या सीओडी डेपो ते देहूरोड कमान या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने वारकरी व भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. लाखो वारकरी ज्या मार्गावरून पायी प्रवास करतात, त्या मार्गावर पावलोपावली खड्डे, उखडलेले साईड पट्टे, तसेच रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या चरांमध्ये साचलेले पावसाचे पाणी यामुळे प्रवास धोकादायक व त्रासदायक बनला आहे.
रस्त्याची तातडीने दुरुस्तीची मागणी
चिंचोली व परिसरातील नागरिकांनी याबाबत पुढाकार घेत समिती स्थापन करून १९ जून २०२६ रोजी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्याधिकारी पुष्पांजली रावत यांना लेखी निवेदन दिले होते. या निवेदनात रस्त्याची तातडीने दुरुस्ती, डांबरीकरण, खड्डे बुजवणे, चर बंद करणे, तसेच पालखी विसावा स्थळावरील काटेरी झुडपे हटवून परिसर सपाट करणे, या कामांची मागणी करण्यात आली होती.
याशिवाय बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर यांची भेट घेऊनही या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्या वेळी सकारात्मक भूमिका घेतली गेल्याचे समितीचे म्हणणे आहे. मात्र, पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असतानाही कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाला संतांचा व त्यांच्या विचारांचा विसर पडला आहे का?, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
बोर्ड प्रशासनाला पाठविले स्मरणपत्र
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच समितीने पुन्हा स्मरणपत्र देत संबंधित मागण्यांची पुनरावृत्ती केली असून, त्याच्या प्रती तहसीलदार व पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत. संरक्षण विभागाकडून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आवश्यक नाहरकत पत्र मिळालेले असतानाही कामे रखडल्याने अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले जात आहे.
रस्त्याच्या अर्धवट कामांमुळे लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी आता तरी प्रशासनाने तातडीने जागे होऊन आवश्यक दुरुस्ती कामे पूर्ण करावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.