Crime News Pudhari
पिंपरी चिंचवड

Dehugaon Crime: देहूगावात कौटुंबिक वादातून पत्नीचा खून; पतीनेही स्वतःवर वार करून गॅलरीतून उडी मारली

ओमकार सोसायटीतील धक्कादायक घटना; शुभांगी बारस्कर यांचा मृत्यू, पती आकाश गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला. त्यानंतर पतीने स्वतःच्या अंगावरही वार करून दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उडी मारली. देहूगाव येथील ओमकार सोसायटीमध्ये रविवारी (दि. २०) पहाटे पावणेसहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

शुभांगी आकाश बारस्कर (२८, रा. ओमकार हाउसिंग सोसायटी, देहूगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती आकाश रामदास बारस्कर (२६, व्यवसाय आयटी कंपनी, रा. ओमकार सोसायटी, देहूगाव) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे सहाच्या सुमारास गस्तीवरील पोलिसांना देहूगाव येथील ओमकार सोसायटी परिसरात एकाला मारहाण झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा घरमालक प्रकाश रामचंद्र राऊत यांच्याकडे भाड्याने राहणारा आकाश बारस्कर हा रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला आढळला.

त्याची पत्नी शुभांगी ही दुसऱ्या मजल्यावरील खोलीत गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी दोघांनाही तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शुभांगी हिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. तर, आकाशवर उपचार सुरू आहेत.

आकाश आणि शुभांगी यांचा डिसेंबर २०२३ मध्ये विवाह झाला होता. मागील चार ते पाच महिन्यांपासून दोघेही ओमकार सोसायटीत भाड्याने राहत होते. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मागील सुमारे एक वर्षापासून दोघांमध्ये वाद सुरू असल्याचे समोर आले आहे. याच वादातून आकाशने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर त्याने स्वतःच्या अंगावरही वार करून बचाव करण्याच्या उद्देशाने दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उडी मारल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. देहूरोड पोलिस तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT