Tukaram Maharaj Beej Sohala Pudhari
पिंपरी चिंचवड

Tukaram Maharaj Beej Sohala: देहूत संत तुकाराम महाराजांचा 378वा वैकुंठगमन सोहळा

लाखो वारकरी भाविकांची उपस्थिती; हरिनामाच्या गजरात देहूनगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली

पुढारी वृत्तसेवा

देहूगाव: श्रीक्षेत्र देहू येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 378व्या सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त लाखो वारकरी भाविकांची उपस्थिती लाभली असून देहूनगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या दाखल होत असून, खासगी वाहने, पीएमपी तसेच एसटी महामंडळाच्या बसमधून भाविकांचा ओघ सुरू आहे.

आपुल्या माहेरा जाईन मी आता |

निरोप या संता हाती आला |

सुख दुःख माझे ऐकीले कानी |

कळवळा मनी करुणेचा ॥

करुनि सिद्ध मूळ साऊले भांतुके |

येती दिसे एकें न्यावयासी |

त्याची पंथी माझे लागलेसे चित्त |

वाट पाहे नित्य माहेराची ॥

तुका म्हणे आता येतील न्यावया |

अगे आपुलिया मायबाप ॥

आजचा सोहळ्याचा कार्यक्रम

गुरुवारी (दि. 5) रोजी पहाटे 3 वाजता मुख्य मंदिरात काकडा आरती होईल. त्यानंतर सकाळी 4 वाजता ‌‘श्रीं‌’ची महापूजा पार पडेल. शिळा मंदिर तसेच तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात पूजन होणार आहे. सकाळी 6 वाजता वैकुंठस्थान मंदिरात पूजा संपन्न होईल. वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त गोपाळपुरा येथील वैकुंठस्थान मंदिरात सकाळी 10 ते 12 या वेळेत हभप देहूकर महाराज यांचे कीर्तन होईल. सकाळी 10.30 वाजता संत तुकाराम महाराजांची पालखी मुख्य मंदिरातून वैकुंठस्थानाकडे प्रस्थान करेल. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या अखंड घोषात पालखी सकाळी 11.45 वाजता वैकुंठस्थान मंदिरात दाखल होईल.

पैल दिसतील भार |

दिंड्या पताका अपार |

आला पंढरीचा राणा |

दिसतील त्याच्या खुणा |

सुख वाटे मना |

डोळे बाह्य स्फूरती |

उठिले गजर नामाचे |

दळभार वैष्णवांचे |

तुका करी रिता ठाव |

त्यासी बैसवया वाव |

दुपारी बारा वाजता कीर्तनात पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा नामघोष होताच उपस्थित लाखो वारकरी आपल्या हातातील तुळशी व पुष्पांचा वर्षाव नांदुरकीच्या वृक्षावर करून सदेह वैकुंठगमन सोहळा अनुभवतील. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते आरती संपन्न होईल. सोहळ्यानंतर पालखी पुन्हा मुख्य मंदिराकडे प्रस्थान करून दुपारी 12.30 वाजता मंदिरात विसावेल.

भक्ती, श्रद्धा आणि हरिनामाच्या गजरात आजचा हा ऐतिहासिक सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने पार पडणार असून, याच देहू, याच डोळा हा दिव्य सोहळा अनुभवण्यासाठी वारकरी भाविक आतुर झाले आहेत.

सर्वत्र ज्ञानोबा-तुकारामचा गजर

देहूकडे येणारे सर्व प्रमुख रस्ते पायी येणाऱ्या वारकऱ्यांनी गजबजले असून, अंतर्गत रस्त्यांवरही गर्दी उसळली आहे. इंद्रायणी घाट, मुख्य मंदिर, वैकुंठस्थान मंदिर, गाथा मंदिर परिसरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गाथा पारायण, हरिपाठ आणि हरिनामाच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. ज्ञानोबा-तुकारामच्या अखंड घोषात दिंड्या देहूत दाखल होत असून, वैष्णवांचा मेळा देहूनगरीत फुलला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT