Highway Encroachment Pudhari
पिंपरी चिंचवड

Dehu Road Highway Encroachment: देहूरोडमध्ये महामार्गाला अतिक्रमणांचा विळखा; वाहतूक कोंडीसोबत अपघातांचा धोका वाढला

दुकाने, व्यावसायिक गाळे आणि बेशिस्त पार्किंगमुळे रस्ता अरुंद; आपत्कालीन सेवांनाही अडथळा, नागरिकांची कठोर कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

देहूगाव: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड परिसरात रस्त्यालगत वाढलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रस्त्याच्याकडेला थाटलेले व्यावसायिक गाळे, दुकाने तसेच ग्राहकांची रस्त्यावरच उभी राहणारी वाहने यामुळे महामार्गाचा मोठा भाग व्यापला जात असून, वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वाहनांच्या रांगा

सणासुदीच्या काळात तसेच शनिवार-रविवारी या मार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यातच रस्त्याच्याकडेला असलेल्या व्यावसायिकांच्या वाहनांमुळे आणि ग्राहकांच्या वाहनांमुळे रस्ता अरुंद होत असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. रस्त्यावर वाढती गर्दी, अस्ताव्यस्त पार्किंग आणि व्यावसायिकांकडून रस्त्याच्या जागेचा होणारा वापर यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

आपत्कालीन सेवांनाही अडथळा

महामार्गालगत असलेल्या काही व्यावसायिकांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रस्त्याच्याहद्दीतच विविध प्रकारचे साहित्य व फलक लावले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. पावसाळ्यात या समस्येत आणखी भर पडत असून, रस्त्यावर साचणारे पाणी, चिखल आणि अस्ताव्यस्त पार्किंग यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. वाहतूक कोंडीमुळे आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. अपघात अथवा अन्य आपत्कालीन प्रसंगी अग्निशामक दलाची वाहने, तसेच रुग्णवाहिकांना घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे गंभीर परिस्थितीत रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

अतिक्रमणांवर कारवाई कधी?

महामार्गालगतची अतिक्रमणे हटविण्याबाबत प्रशासनाकडून वेळोवेळी आश्वासने दिली जातात. मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसत नाही. वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बेशिस्त पार्किंगचा फटका

महामार्गाची दुरवस्था, रस्त्यालगतचे अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंग या तिन्ही समस्यांचा फटका नागरिकांना बसत आहे. संबंधित प्रशासनाने केवळ कारवाईचा दिखावा न करता महामार्गाची हद्द निश्चित करून अतिक्रमणे हटवावीत, रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच, वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या व्यावसायिकांवरही कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT