Dapodi Pimple Gurav Road Repair Pudhari
पिंपरी चिंचवड

Dapodi Pimple Gurav Road Repair: दापोडी-पिंपळे गुरव रस्त्यावर पावसाळ्यातच चेंबर दुरुस्ती; रखडलेल्या कामांमुळे नागरिक, वाहनचालक त्रस्त

तुटलेली झाकणे बदलण्याचे काम कासवगतीने; पाणी साचणे, अपघाताचा धोका आणि गैरसोयींमुळे महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

दापोडी: शितळादेवी चौक ते पिंपळे गुरव रस्त्यावर चेंबरची दुरुस्ती व झाकणे टाकण्याचे काम सुरू आहे. उन्हाळ्यातील कामे पावसाळ्यात सुरू आहेत. तुटलेली व जीर्ण झाकणे बसविण्याचे कामे कासवगतीने सुरू आहेत. वरातीमाघून घोडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या गोष्टीचा नाहक त्रास नागरिक व वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.

महापालिकेच्या वतीने स्थानिक रहिवाशांना सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. परिसरात सर्व कामे नियोजनबद्ध व वेळेत व्हावीत, म्हणून प्रभागाप्रमाणे सभा घेऊन जीवाचा आटापिटा केला जातो. चिरीमिरीसाठी कामे रखडून ठेवली जातात. टेंडर वेळेवर पास करूनही कामे वेळेवर होत नाहीत. याचे गौडबंगाल काय आहे. याबद्दल नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वाहनचालकांना अपघाताचा धोका

दापोडी ते पिंपळे गुरव हा रस्ता नेहमीच वर्दळीचा असतो. दापोडीतील जुना पुणे-मुंबई महामार्ग, रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, जवळच पोलिस ठाणे आदी परिसराला जोडणारा मुख्य रस्ता आहे. ड्रेनेज आणि पावसाळी चेंबर हे सध्या विविध भागामध्ये गंभीर अपघातांचे व दुर्गंधीचे कारण ठरत असून, यावर तातडीने दुरुस्ती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे

या पद्धतीने केले जातेय काम

  • जीर्ण झाकणे बदलणे : जुनी, तुटलेली किंवा लोखंडी गंजलेली झाकणे बदलून त्याठिकाणी उच्च क्षमतेची नवीन झाकणे बसवली जात आहेत.

  • सक्शन-कम-जेटिंग मशिनचा वापर : ड्रेनेज चेंबर मानवी हस्तक्षेपाशिवाय साफ करण्यासाठी अत्याधुनिक रिसायकलिंग सक्शन मशिनचा वापर केला जात आहे. ज्यामुळे चोकअपची समस्या तात्काळ सुटते.

  • गाळ व कचरा काढणे : पावसाळ्यात पाणी रस्त्यावर साचू नये, म्हणून पावसाळ्यापूर्वीच चेंबरमधील गाळ, माती आणि कचरा पूर्णपणे काढून साफ केला जातो.

  • पाणी गळती रोखणे : ड्रेनेजचे दूषित पाणी पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीमध्ये मिसळू नये, म्हणून जलवाहिन्यांच्या जवळ असलेल्या चेंबरचे तांत्रिक ऑडिट करून त्यांची गळती थांबवली जात आहे.

परिसरातील चेंबर दुरुस्तीची कामे सुरू आहेत. पावसाच्या रिपरिपीमुळे काम करण्यास अडथळा निर्माण होत आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर कामे वेगाने पूर्ण होतील. नागरिक, वाहनचालकांनी सहकार्य करावे.
पूजा दुधनाळे, क्षेत्रीय आधिकारी, ह क्षेत्रीय कार्यालय
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पाण्याचा निचरा होत नाही. दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यातच या खोदकामामुळे नागरिक व वाहनचालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.
हेमंत फुगे, स्‍थानिक नागरिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT