दापोडी: पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर दापोडी येथे विनापरवाना ट्रक संशयास्पद स्थितीत धावताना आढळून आला. हा ट्रक रिकाम्या टाक्या घेऊन महामार्गावर प्रवास करत होता; परंतु नागरिकांच्या सर्तकतेमुळे त्यांनी ट्रक अडवून पोलिस प्रशासनाला माहिती दिली. यामुळे अनर्थ टळण्यास मदत झाली आहे.
या वेळी अतुल पवार यांनी सदर वाहन (एम एच 13 ए एक्स 4786) थांबवून वाहनचालकाची चौकशी केली. वाहनचालकाने सांगितले की, तो मुंबईहून सोलापूरकडे जात आहे. मात्र वाहनचालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स व कागदपत्रे विचारल्यावर वाहनचालकाने स्पष्ट केले की वाहन परवाना संपलेला आहे. तसेच ‘गाडीचा परवाना ऑनलाइन चेक करा’ असे उत्तर दिले. त्यामुळे वाहन अनधिकृत पद्धतीने वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले.
या गंभीर बाबीची दखल घेत 112 वर कॉल करून संबंधित विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत योग्य ती कार्यवाही केली. अशा पद्धतीने परवाना संपलेली वाहने रस्त्यावर धावत असल्याने नागरिकांच्या तसेच इतर वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे संबंधित प्रशासनाने आशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
विशेष म्हणजे सदर ट्रक क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहत असल्याने एका बाजूला कललेला होता. तरीही चालक वेगाने व बेधुंदपणे वाहन चालवत होता. हे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. अशा प्रकारच्या वाहनांमुळे अपघातांची शक्यता वाढत असल्याने प्रशासनाने कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना वाहतूक पोलिसांनी कराव्यात, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.