संतोष शिंदे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील रोडरोमिओ, टवाळखोर आणि महिलांना त्रास देणाऱ्यांना दामिनी पथकांनी चांगलाच दणका दिला आहे. मागील दोन महिन्यांत दामिनी पथकांनी 57 रोडरोमिओंवर कायदेशीर कारवाई केली असून, गस्तीदरम्यान महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या सात जणांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी शहरभर सुरू असलेल्या या धडक मोहिमेमुळे टवाळखोरांमध्ये खळबळ उडाल्याचे चित्र आहे.
उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात दररोज हजारो महिला, तरुणी आणि विद्यार्थिनी शिक्षण, नोकरी आणि व्यवसायानिमित्त घराबाहेर पडतात. आयटी पार्क, औद्योगिक वसाहती, शाळा, महाविद्यालये, बसथांबे, बीआरटी मार्ग, सार्वजनिक चौक आणि गर्दीच्या परिसरात महिलांची मोठी वर्दळ असते. याच गर्दीचा फायदा घेत काही टवाळखोर महिलांकडे पाहून हॉर्न वाजवणे, शिट्ट्या मारणे, पाठलाग करणे, अश्लील हावभाव करणे, गाणी म्हणणे, दुचाकींवरून घिरट्या घालणे, घोळका करून उभे राहणे असे प्रकार करत असल्याच्या तक्रारी सातत्याने पोलिसांकडे येत होत्या. विशेषतः शाळा आणि महाविद्यालय परिसरात मुलींना मानसिक त्रास देण्याचे प्रकार वाढत असल्याने पोलिसांनी दामिनी पथकांच्या माध्यमातून विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत टवाळखोरांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू आहे.
अश्लील हावभाव करणारे अटकेत
गस्तीदरम्यान महिलांची छेड काढणे, सार्वजनिक ठिकाणी चुकीचे वर्तन करणे किंवा महिलांकडे पाहून अश्लील हावभाव करणाऱ्या व्यक्तींवर दामिनी पथकांनी थेट कारवाई केली आहे. मागील दोन महिन्यांत 57 रोडरोमिओंना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. यातील सात गंभीर प्रकरणांमध्ये संबंधित आरोपींवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले.
शहरात 34 दामिनी पथकांचा पहारा
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात सध्या एकूण 34 दामिनी पथके कार्यरत आहेत. या पथकांमध्ये 68 महिला पोलिस अंमलदार कार्यरत असून, त्यांच्याकडून शहरभर नियमित गस्त घालण्यात येते. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलांची वर्दळ असलेले परिसर, शाळा-महाविद्यालये, बसथांबे, मेट्रो स्थानके, सार्वजनिक उद्याने आणि हॉटस्पॉट ठिकाणांची स्वतंत्र माहिती तयार करण्यात आली आहे. त्यानुसार दामिनी पथके अचानक भेटी देऊन संशयास्पद हालचाली करणाऱ्यांवर नजर ठेवतात. मागील दोन महिन्यांत दामिनी पथकांनी शहरातील विविध हॉटस्पॉट परिसरांना तब्बल 6 हजार 200 वेळा भेट दिल्याची नोंद आहे.
नोकरदार महिला, विद्यार्थिनींमध्ये जागृती
महिलांच्या सुरक्षेबरोबरच विद्यार्थिनींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी दामिनी पथकांनी शाळा आणि महाविद्यालयांमध्येही मोठ्या प्रमाणात जागृती मोहीम राबविली आहे. जानेवारी आणि फेबुवारी या दोन महिन्यांत दामिनी पथकांनी तब्बल 10 हजार 473 वेळा शाळा आणि महाविद्यालयांना भेटी दिल्या आहेत. या भेटीदरम्यान विद्यार्थिनींना छेडछाड, सायबर गुन्हे, सोशल मीडियावरील फसवणूक, ब्लॅकमेलिंग तसेच महिलांवरील गुन्ह्यांबाबत माहिती देण्यात आली. अनेक ठिकाणी विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र संवाद सत्र घेण्यात आले. शाळांमध्ये ठेवण्यात आलेल्या तक्रार पेट्यांची तपासणी करून विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.
कायदेशीर कारवाईसह समुपदेशनावरही भर
महिलांसाठी सुरू असलेल्या 1091 हेल्पलाईन आणि डायल 112 या आपत्कालीन सेवांवर मागील दोन महिन्यांत एकूण 95 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींमध्ये छेडछाड, पाठलाग, कौटुंबिक वाद, सार्वजनिक ठिकाणी होणारा त्रास तसेच संशयास्पद हालचालींच्या तक्रारींचा समावेश होता. अशा प्रत्येक तक्रारीवर दामिनी पथकांनी प्रतिसाद देत संबंधित ठिकाणी धाव घेतली. अनेक प्रकरणांमध्ये तातडीने समुपदेशन करून वाद मिटविण्यात आले, तर गंभीर प्रकारांमध्ये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
ज्येष्ठांची विशेष काळजी
दामिनी पथकांकडून केवळ महिलांच्या सुरक्षेवरच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेवरही विशेष लक्ष दिले जात आहे. शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक घरी एकटे राहत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दामिनी पथकांकडून नियमित भेटी दिल्या जात आहेत. दोन महिन्यांत तब्बल 1 हजार 196 ज्येष्ठ नागरिकांना भेट देऊन त्यांच्या समस्या, अडचणी आणि सुरक्षेबाबत माहिती जाणून घेण्यात आली. अनेक ज्येष्ठ नागरिकांना सायबर फसवणूक, बनावट कॉल, आर्थिक व्यवहारातील धोके याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.
व्हॉट्स ॲपवरही तक्रारी
दामिनी पथकांच्या मोबाईल आणि व्हॉट्स ॲप क्रमांकावरून महिलांनी थेट संपर्क साधण्याचे प्रमाणही वाढले आहे. मागील दोन महिन्यांत तब्बल 256 महिलांनी दामिनी पथकांशी संपर्क साधून विविध तक्रारी आणि समस्या मांडल्या. महिलांना पोलिसांपर्यंत पोहोचणे सोपे व्हावे आणि भीती न वाटता मदत मागता यावी, यासाठी दामिनी पथकांकडून सातत्याने संवाद ठेवला जात आहे. पोलिसांनी या सर्व तक्रारींचे समाधान केल्याचा दावा केला आहे.
घराबाहेर पडणाऱ्या महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे, हा दामिनी पथकांचा मुख्य उद्देश आहे. शहरातील विविध भागात दामिनी पथके नियमित गस्त घालत आहेत. रोडरोमिओ, टवाळखोर आणि महिलांना त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. महिलांनी कोणतीही भीती न बाळगता दामिनी पथक अथवा स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार करावी.विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड