सायबर पोलिसांच्या कारवाईमुळे फसवणुकीत 30 कोटींची घट Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri cyber fraud crackdown: सायबर पोलिसांच्या कारवाईमुळे फसवणुकीत 30 कोटींची घट

200 मास्टरमाईंडना अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेट्स उध्वस्त; जनजागृती आणि तांत्रिक तपासाचा प्रभाव

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सायबर पोलिसांनी केलेल्या जोरदार कारवायांमुळे शहरातील सायबर गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आंतरराष्ट्रीय रॅकेट्सचा पर्दाफाश, राज्याबाहेर जाऊन केलेल्या कारवाया, सततची जनजागृती आणि तांत्रिक तपास यांचा एकत्रित परिणाम झाल्याने यावर्षी गुन्ह्यांची संख्या आणि फसवणुकीची रक्कम लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.(Latest Pimpri chinchwad News)

200 मास्टरमाईंडना बेड्या

सायबर विभागाने शहरापुरतीच कारवाई न करता इतर राज्यांतही धडक कारवाया केल्या आहेत. या मोहिमेत तब्बल 200 मास्टरमाईंड गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. या कारवायांमध्ये फसवणुकीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटला धक्का देत चीन, बांगलादेश, दुबईसारख्या ठिकाणांशी संबंधीत हॅकर्स आणि कॉल सेंटर रॅकेट्सची साखळी मोडीत निघाल्याचा पोलिसांचा दावा आहे.

सायबर मोडस ऑपरेंडीचा अभ्यास

सायबर विभागाने तपास करताना अनेक नव्या आणि प्रचलित मोडस (गुन्हे पद्धत) उघडकीस आणल्या आहेत. बँक खाते बंद होईल या भीतीने लोकांना लिंक्स पाठवून पासवर्ड चोरले जात होते. तातडीने कर्ज मिळेल, असे सांगून लोकांकडून डाटा व पैसे उकळले जात होते. मोबाईल टॉवर अपडेट, वीजबिल थकबाकी, कुरिअर पार्सल तपासणी अशा बहाण्याने जढझ मिळवला जात होता. शेअर मार्केट/क्रिप्टो गुंतवणूक, दुहेरी नफा दाखवून लाखो रुपये गंडवले जात होते. स्वस्त खरेदी किंवा उच्च पगाराची नोकरी देण्याच्या बहाण्याने पैसे घेतले जात होते. या सर्व पद्धतींचा बारकाईने अभ्यास करून पोलिसांनी करवाई केली.

पोलिसांकडून जनजागृती

सायबर विभागाने सातत्याने जनजागृती मोहीम राबवली. शाळा-कॉलेज, बँका, गृहनिर्माण सोसायट्या आणि उद्योग परिसरात शिबिरे घेऊन नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सोशल मीडियावर वेगवेगळे उपक्रम राबवून फसवणुकीचे प्रकार, त्यांचे उपाय आणि हेल्पलाईन नंबर जनतेपर्यंत पोहोचवले. गणेश उत्सवात देखील फलक लावून जनजागृती केली. यामुळे नागरिकांमध्ये सजगता वाढली आणि गुन्हेगारांना सहजासहजी गंडा घालणे कठीण झाले आहे.

तात्काळ पत्रव्यवहार

पोलिसांनी प्रत्येक तक्रारीवर तत्काळ कारवाई करून संशयित खाते गोठवले. बँका आणि पेमेंट गेटवे कंपन्यांशी समन्वय साधणे, तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देणे या गोष्टींवर सायबर पोलिसांनी यंदा विशेष भर दिला. त्यामुळे गुन्हेगार पकडण्यासोबत मोठ्या प्रमाणावर फसवणूक झालेली रक्कमही जप्त करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे सायबर चोरट्यांचे धाबे दणाणले असून, पिंपरी-चिंचवड शहरासह इतर राज्यांतही ही कामगिरी चर्चेचा विषय ठरत आहे.

तक्रारदाराचा अनुभव

पिंपरीतील रहिवासी विजय पाटील (नाव बदलले आहे) यांना सायबर गुन्हेगारांनी एक कोटी 30 लाख रुपयांचा गंडा घातला होता. त्यांनी तातडीने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी बँकेच्या मदतीने तत्काळ खाते गोठवले आणि मोठा आर्थिक तोटा होण्यापासून त्यांना वाचवले. माझ्यासारख्या अनेकांना फोन, लिंक किंवा ॲप्सच्या जाळ्यात अडकवले जात आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वेळेत मदत केली नसती तर मी कर्जात बुडालो असतो. आता, मात्र मी व माझे कुटुंब सतर्क झाले आहोत, असे पाटील यांनी ‌‘पुढारी‌’शी बोलताना सांगितले.

पोलिस नाही, आकडे बोलतात..!

यावर्षीच्या जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत 160 कोटी 91 लाख 26 हजार 472 रुपयांचा फसवणुकीचा आकडा नोंदवला गेला आहे. तर मागील वर्षी याच कालावधीत तो तब्बल 190 कोटी 43 लाख 35 हजार 932 रुपयांपर्यंत पोहोचला होता. म्हणजेच सायबर पोलिसांच्या कारवाईमुळे यंदा जवळपास 30 कोटी रुपयांची घट झाली असून हा मोठा सकारात्मक बदल मानला जात आहे.

सायबर गुन्हेगार कितीही शिताफीने गुन्हे करत असले तरीही ते पोलिसांच्या तावडीतून सुटू शकत नाहीत. आमच्या पथकाने गुन्हे उघडकीस आणण्यासाठी चिकाटीने प्रयत्न केला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय रॅकेट्सचा पाया उखडला आहे. गुन्ह्यांची संख्या कमी होणे हे नागरिकांच्या जागरूकतेसह आमच्या कारवाईचे फलित आहे. आम्ही नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध आहोत.
डॉ. शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, गुन्हे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT