खराळवाडी: पिंपरी शहरासह खराळवाडी, लालटोपीनगर संत तुकारामनगर, मासुळकर कॉलनी, मोरवाडी, अजमेरा, म्हाडा कॉलनी, पिंपरी, भाजीमंडई या परिसरात मागील दहा दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे.
याकडे महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग दुर्लक्ष करत आहे. दूषित, दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी महापालिका प्रशासनाने शहराला शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. (Latest Pimpri News)
पावसाच्या तोंडावर आता पिंपरी शहरात अतिशय दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
याबाबत तातडीने महापालिका पाणीपुरवठा विभागाने लक्ष द्यावे. दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाण्यामुळे रमाबाईनगर, भीमनगर, गांधीनगर, नेहरूनगर, खराळवाडी, यशवंतनगर, अजमेरा परिसरात सर्दी, खोकला, थंडीताप, पोटदुखी, उलटी, अतिसार यासारखे आजाराने डोके वर काढले आहे. उपचारासाठी नागरिक जवळच्या खासगी व महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात गर्दी करताना दिसून येत आहेत.
पाण्याला येतोय उग्र वास
खराळवाडी, पिंपरी परिसर, मासूळकर कॉलनी, नेहरुनगर आदी परिसरात महापालिकेकडून जो पाणीपुरवठा करण्यात येत आहे त्याला उग्र वास येत आहे. यामुळे पाणी पिऊ वाटत नाही. तसेच दूषित पाण्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक पोटाच्या विकाराने त्रस्त आहेत. महापालिका प्रशासनाने शुद्ध आणि सुरळीत पाणीपुरवठा करून नागरिकांचे पाण्यामुळे होणारे हाल थांबवावेत, अशी मागणी होत आहे.
सध्या खराळवाडी, नेहरुनगर, मासूळकर कॉलनी आदी परिसरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाणी पिण्यासाठी घेतले की उग्र स्वरूपाचा वास येत आहे. गेले पंधरा दिवसांपासून हे दुर्गंधीयुक्त पाणी येते. महापालिकेच्या संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार करून देखील पाणीपुरवठ्यात सुधारणा होत नाही. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा.- प्रवीण कांबळे, नागरिक.
सध्या खराळवाडी येथील दवाखान्यात पोटदुखी, उलटी, अतिसार या रुग्णांची संख्या वाढली आहे. हे आजार दूषित पाण्यापासून होतात. रोज 55 ते 60 रुग्णांना दवाखान्यात उपचार केले जात आहेत.- डॉ. वर्षा कदम, वैद्यकीय अधिकारी, महापालिका खराळवाडी उपकेंद्र.
तपासणी केली आहे. पाणी पिण्यासाठी योग्य आहे. तरी या परिसरात पाणीपुरवठा विभाग लक्ष ठेवून आहे. प्रशासनाने या परिसरात काळजी घेतली आहे.- महिंद्र देवरे, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा