सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले File Photo
पिंपरी चिंचवड

Health News: काळजी घ्या! सर्दी, खोकला अन् तापाचे रुग्ण वाढले; कोविडच्या बातम्यांमुळे लोकांमध्ये संभ्रम

सर्दी, पडसे, खोकला आणि तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या सुमारे 25 ते 30 टक्के वाढली

पुढारी वृत्तसेवा
  • तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत वाढ

  • खासगी दवाखाने, हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या रांगा

  • मेडिकल दुकानातून आयुर्वेदिक औषधांना मोठी मागणी

  • काही दुकानांमध्ये मास्क, हॅन्डवॉश आदी उपलब्ध

तळेगाव दाभाडे : गेल्या आठवड्यापासून बरसलेल्या अवकाळी पावसामुळे मावळ तालुक्यातील वातावरण आरोग्यासाठी बाधक झाले आहे. सर्दी, पडसे, खोकला आणि तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या सुमारे 25 ते 30 टक्के वाढली आहे. त्यात भर म्हणून कोविड-19 संदर्भातील बातम्या पुन्हा चर्चेत येऊ लागल्याने लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोविड रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे वृत्त येत असले तरी त्यामागे राजकीय हेतू आणि माध्यमांवरील दबाव असल्याचा संशय येथी नागरिकांनी व्यक्त केला आहे. अशा बातम्यांमुळे कोविड काळातील जुन्या जखमा उफाळून येत असून वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार मंडळीनी प्रतिबंधक उपाय घेणे हे उपचारापेक्षा चांगले असल्याचा सल्ला रुग्णांना दिला आहे.

येत्या तीन महिन्यांत होणार्‍या निवडणुकीची पार्श्वभूमी पाहाता या काळात अशा बातम्या येणं काहीसं संशयास्पद वाटत असल्याचे मत काही नागरिकांनी ‘पुढारी’ प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले. काही माध्यमे आणि समाजमाध्यमे घाबरवणार्‍या बातम्या चालवतायत। त्याद्वारे, पुन्हा निर्बंध लागू करण्याची भूमिका तयार केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पावसाळ्यात काही रोगांचा संसर्ग वाढू शकतो, त्यामुळे प्रत्येकाने आरोग्याबाबत काळजी घ्यावी.आरोग्याविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे. अफवांपासून दूर राहून मास्क, स्वच्छता आणि सर्दी खोकला ताप आदी आजारांकडे दुर्लक्ष न करणे हिताचे राहील.
डॉ. राजेंद्र देशमुख, तळेगाव दाभाडे

दरम्यान, कोविडच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेत मित्र, नातेवाईकांना गमावलेले लोक बातम्यांमुळे अधिक संभ्रमात पडले आहेत. विशेषतः महिलांमध्ये चिंतेची बाब प्रकर्षाने असल्याचे असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा पुणे जिल्हा दक्षता समिती सदस्य सविता सुराणा यांनी सांगितले. प्रशासनाने वास्तव आणि अफवांवर नागरिकांना वेळीच माहिती दिल्यास संभ्रमाचे वातावरण कमी करता येईल, असेही त्या म्हणाल्या.

या पार्श्वभूमीवर आरोग्य तज्ज्ञांनी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मावळसारख्या ग्रामीण भागांमध्ये नागरिक अधिक सतर्क होत असल्याचे दिसते. राजकारण काहीही असो, रोग परत आल्यास आपणच स्वतःची काळजी घ्यायला हवी, असे मत मारिओ डिसुझा, दत्ता अगळमे यांनी व्यक्त केले.

सध्या आरोग्य विभागाने कुठलाही नवीन लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लागू केलेले नसले तरी गर्दी टाळणे, मास्क वापरणे आणि स्वच्छता राखण्याच्या सूचना पुन्हा अधोरेखित केल्या आहेत. राजकीय हस्तक्षेप अनेकदा होत असले तरी त्याच्या आहारी न जाण्याचा सल्ला प्राथमिक आरोग्य केंद्राचे माजी फार्मासिस्ट सुशीर पाटील यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.

कोविड-19 संदर्भातील बातम्यांनी जनतेत नव्याने अस्वस्थता निर्माण केली असून, त्यामागे तथ्य किती आणि राजकीय हेतू किती, यावर चर्चांना उधाण आलेआहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT