Pcmc News: लग्नसमारंभावर पावसाचे विरजण
पिंपरी : मे महिना हा लग्नसराईचा असल्याने शहरातील मंगल कार्यालयातील बुकिंग फुले झालेले आहे. हॉल आणि लॉनमध्ये असलेल्या मंगल कार्यालयात दररोज दोन तरी लग्न समारंभ पार पडत आहेत. मात्र, या आठवड्यात अवकाळी पावसामुळे लग्नसमारंभातील आनंदावर विरजण पडत आहे.
लाखोंचा खर्च पाण्यात
मे महिन्यामध्ये लग्नसमारंभाची धूम आहे. मात्र, वादळी पावसामुळे लग्नसोहळ्यावर केलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात जात आहे. त्यामुळे वधू-वर पित्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे लग्नसमारंभात अडथळा निर्माण होत आहे. डेकोरेशन भिजणे, पडदे फाटणे, विद्युतपुरवठा खंडीत होणे असे प्रकार घडत आहेत.
खरेदीसाठी घराबाहेर पडता येईना
अनेकांची लग्नाची खरेदी जोरात सुरू आहे. मात्र, पावसामुळे घराबाहेर पडता येत नसल्यामुळे खरेदी रखडली आहे. तसेच, पावसामुळे लग्नासाठी घरात आलेल्या पाहुण्यांची सोय करताना दमछाक होत आहे.
लग्न पार पडेपर्यंत धाकधूक
एकीकडे पाऊस थांबत नाही, तर दुसरीकडे लग्नसमारंभ जवळ आल्यामुळे वधू-वर माता-पित्यांची काळजी वाढली आहे. सायंकाळच्या सुमारास असणार्या लग्न आणि रिसेप्शन समारंभामध्ये हमखास पाऊस येत असल्याने वर्हाडी मंडळींना हॉलमध्ये सुरक्षितस्थानी हलवावे लागत आहे. लॉनमध्ये लग्न करणार्यांची तर सोहळा पार पडेपर्यंत धाकधूक होत आहे. महिनाभर केलेली तयारी आणि लग्नासाठी लाखो रुपयांचा केलेला खर्च पावसामुळे वाया जात आहे.

