भटक्या श्वानांवर प्रभागनिहाय नसबंदी करता येईल का? शहरातील वाढत्या श्वान संख्येमुळे नागरिक हैराण Pudhari Photo
पिंपरी चिंचवड

Street Dogs: भटक्या श्वानांवर प्रभागनिहाय नसबंदी करता येईल का? शहरातील वाढत्या श्वान संख्येमुळे नागरिक हैराण

महापालिका प्रशासनाने प्रभागनिहाय श्वान नसबंदी केली, तर पुढील काळात कुत्र्यांची संख्या कमी होण्यास मदत होईल.

पुढारी वृत्तसेवा

खराळवाडी: मागील काही दिवसांपासून पिंपरी शहर, उपनगरांत श्वानांवरील नसबंदी बंद असल्याने कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. महापालिकेच्या नऊ नंबर प्रभागात भटक्या श्वानांची संख्या मोठी आहे. यामुळे शहरातील नागरिकांना प्रवास करताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने प्रभागनिहाय श्वान नसबंदी केली, तर पुढील काळात कुत्र्यांची संख्या कमी होण्यास मदत होईल.

विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक रस्त्याने जाताना त्यांना भटक्या कुत्र्यांच्या सामना करावा लागत आहे. नसबंदीचा उपक्रम बंद असल्याने श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे मोकाट श्वानाची नसबंदी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. (Latest Pimpri News)

काही दिवसांपासून नसबंदी रखडल्याने पिंपरी शहरांतील खराळवाडी, रोपलास, लोटस हॉटेल, कामगारनगर, गांधीनगर, बजरंगनगर, दुर्गामाता मंदिर, महिंद्रा मॉल, अत्मानगर, महापालिका भवन, कमला क्रॉस मार्केट, कामगार भवन परिसरात मोकाट श्वानांचा उन्माद वाढला आहे.

पुढारीने वेळोवेळी शहरातील भटकी श्वानांकडून नागरिकांना होणार्‍या त्रासाकडे लक्ष वेधले आहे. महापालिका प्रशासनाने नसबंदीची जबाबदारी काही खासगी संस्थांकडे सोपवली आहे, असे सांगितले जात होते.

तरी अजूनही नसबंदीच्या उपक्रमाला प्रशासनाने सुरुवात केली नाही. त्यामुळे अनेक नागरिकांना भटक्या श्वानांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या. भटकी श्वानाची प्रभागनिहाय सर्व्हे करताना प्रभागातील श्वानाची संख्या याची सरासरी माहिती गोळा करावी, तरच भटक्या श्वानांवर नसबंदी करायला सोपे जाईल.

मी वेळोवेळी पत्रव्यवहार व जनसंवाद सभेत ही मागणी केली आहे. त्या वेळी मला सांगितले की, सध्या डॉक्टरांची कमतरता आहे. 15 जुलैनंतर आपण भटक्या श्वानांवर नसबंदी सुरू करणार आहे; परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे.
- अस्लम शेख, सामाजिक कार्यकर्ते.
कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी नवीन स्टाफ घेण्यास सुरुवात केली आहे. येत्या शनिवारपासून मोकाट श्वानांवर नसबंदी करायला सुरुवात केली जाईल.
- संदीप खोत, उपायुक्त, पशु वैद्यकीय विभाग, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT