

वर्षा कांबळे
पिंपरी: नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी महापालिकेने शहरात रुग्णालये उभारली आहेत. येथील आरोग्य सुविधांचा नागरिकांना फायदा होत असला तरी सांगवी आणि भोसरीतील नवीन रुग्णालयात मात्र सुविधांची वानवा दिसत आहे. त्यामुळे येथे येणार्या रुग्णांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अथवा महापालिकेची इतर रुग्णालये किंवा खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे.
महाालिकेच्या जुनी सांगवी रुग्णालय लोकसंख्येच्या तुलनेत अपुरे पडत आहे. येथे दररोज साधारणत: दीडशे ते दोनशे रुग्ण उपचारासाठी येतात. जुनी सांगवी, दापोडी, पिंपळे गुरव आदी परिसरातील नागरिक उपचारासाठी येतात. अपुर्या जागेमुळे रुग्णांची मोठी तारांबळ होते. सोळा खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, ओपीडी, वैद्यकीय अधिकारी आहेत. ओपीडीमध्ये गरोदर महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्यावर उपचार आणि लसीकरणाची सुविधा आहे. (Latest Pimpri News)
सांगवी रुग्णालयात सोनोग्राफी नाही
या रुग्णालयात फक्त गरोदर महिलांना दाखल केले जाते. गरोदर महिलांना दर महिन्याला सोनोग्राफी करावी लागते. मात्र, याठिकाणी सोनोग्राफी मशीन नसल्याने येथे येणार्या रुग्णांना पालिकेच्या इतर रुग्णालयात जावून किंवा खासगी सोनोग्राफी केंद्राकडे धाव घ्यावी लागते.
अपुरी जागा
रुग्णालय जुने असल्याने तसेच वाढत्या लोकसंख्येच्या मानाने येथे सुविधांमध्ये वाढ केलेली नाही. अपुर्या जागेमुळे रुग्णांसमवेत आलेल्या नातेवाईकांना आपली वाहने प्रवेशव्दाराबाहेर रस्त्याकडेला उभी करावी लागतात. लसीकरण मोहीम किंवा इतर सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबविताना येथे वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. मुख्य रस्ता असल्याने वाहनांची या रस्त्यावरुन मोठी वर्दळ असते.
नवीन भोसरी रुग्णालयातदेखील समस्या
शंभर खाटांची क्षमता असलेले आणि कोट्यावधी रूपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेले भोसरी रुग्णालयात गैरसोयींची भर पडत आहे. याठिकाणी भोसरी, मोशी, चर्होली, डुडुळगाव, धावडेवस्ती या ठिकाणचे नागरिक उपचारासाठी येतात. तसेच, याठिकाणी एमआयडीसी असल्याने दाट लोकवस्ती आहे. यामुळे रूग्णांचा सतत ओघ याठिकाणी असते.
रुग्णालयात प्रसुतीगृहासाठी 60 बेड आहेत. 30 बेड मेडिसीनचे, 10 बेड आयसीयू आहेत. 5 बेड एनआयसीयू आहे. सोनोग्राफी, एक्स-रे, लसीकरण, कुटुंबकल्याण, रक्त तपासणी, शस्त्रक्रिया विभाग आहे. तसेच, नर्सिंग स्टाफ, फिजिशियन, चेस्ट फिजिशियन आहे.
आयसीयू अन् एनआयसीयू नाही
या रुग्णालयात अतिजोखमीच्या गरोदर महिलां प्रसुतीसाठी आल्यास येथे आयसीयूची सुविधा नाही. तसेच, जन्मजात बालकाला एनआयसीयूची गरज लागते, अशावेळी वायसीएम किंवा थेरगाव रुग्णालयात पाठविले जाते.
सर्जिकल वॉर्ड नाही
रुग्णालयात फक्त गायनिक सर्जरी होते. सर्जिकल वॉर्ड आणि सर्जिकल आयसीयू नाही. तसेच, सर्जन नसल्याने इतर प्रकारच्या जनरल सर्जरी होत नाही. त्यामुळे अपघातग्रस्त व्यक्तींना ठेवण्याची कोणतीही व्यवस्था नाही.
ओपीडीला अपुरी जागा आहे
रुग्णालयात ओपीडीसाठी जागा अपुरी आहे. त्यामुळे रुग्णालयात रूग्णांची आणि नातेवाईकांची गर्दी झाल्यावर बसण्यास जागा नसते. अपुर्या जागेमुळे कर्मचार्यांची, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची दमछाक होते.
कर्मचार्यांची नेहमीच कमतरता
रुग्णालयात कायमस्वरूपी कर्मचारी कमी आहेत. त्यामुळे कंत्राटी कर्मचार्यांची नेमणूक केली जाते. मात्र, हे कंत्राटी कर्मचारी सारखे रुग्णालय बदलत असल्याने याठिकाणी कर्मचार्यांची कमतरता जाणवते. परिणामी कायमस्वरूपी असणााया कर्मचार्यांवर ताण पडतो. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याशी संपर्क केला असता, संपर्क होवू शकला नाही.
जुनी सांगवी रुग्णालयात सोनोग्राफी होत नाही. त्यामुळे गरोदर महिलांची गैरसोय होते. मनपा प्रशासनदेखील यामध्ये उदासीन आहे. रूग्णांची सोय केली तर व्याप वाढेल याकारणाने सुविधा वाढवित नाहीत.
- मंगेश बोधक, रहिवासी, जुनी सांगवी
रुग्णालयात गेल्यानंतर सोनोग्राफीसाठी जिल्हा रुग्णालय किंवा वायसीएमची चिठ्ठी देतात. त्यामुळे आम्हाला मनपा रुग्णालय असताना जवळ जिल्हा रुग्णालयात जावे लागते.
- महेश वाघ, रहिवासी