

PMRDA growth hub planning
पिंपरी: पुणे महानगर प्रदेश क्षेत्र (पीएमआरडीए) ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याची राज्य शासनाची तयारी सुरू झाली आहे. विकास आराखडा रद्द झाल्यानंतर आता जिल्ह्याचा एकूण विकास व्हावा, या उद्देशाने नियोजन करण्यात आले आहे.
ग्रोथ हब बनविण्यासाठी यशदा नियोजनाचा आराखडा तयार करणार आहे. याबाबत पहिली प्राथमिक बैठक संपन्न झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक होणार आहे. या आराखड्याची अंमलबजावणी महापालिका, पीएमआरडीए यांच्यासह अन्य शासकीय यंत्रणा काम करणार आहे. (Latest Pimpri News)
पुणे महानगर प्रदेश हे तंत्रज्ञान, उत्पादन, शिक्षण आणि हरित गतिशीलतेमध्ये आघाडीवर आहे. यामुळे पुणे ग्रोथ हब म्हणून विकसित होईल, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. मंत्रालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
जिल्ह्यामध्ये आयटी कंपन्या, कारखाने, मेट्रो, रिंगरोड, औद्योगिक कॉरिडॉर्स आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सुविधा असल्याने यशदा ही शासकीय संस्था आर्थिक वाढीचे धोरण आणि नियोजन आराखडा तयार करणार आहे. कामाबाबतचे निरीक्षण विभागीय आयुक्त करणार आहेत. तर, त्याबाबतचा निधी हा पीएमआरडीएकडून उपलब्ध होणार आहे. त्यासाठी अंदाजित खर्च हा आठ कोटी असेल.
आर्थिक उन्नतीवर भर
प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत असलेल्या तालुक्यांमध्ये आर्थिक उन्नती कशी होईल, याबाबत एक प्लॅन तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे त्यासाठी लागू करण्यात आलेल्या निधीबाबत अधिक चांगल्या प्रकारे आणि कशाप्रकारे काम करता येईल, याबाबत अभ्यास होणार आहे. त्यासाठी यशदा ही स्वतंत्र एजन्सी नेमणूक करणार आहेत.
त्याबाबत माहिती आणि अभ्यास केल्यानंतर तो यशदा संस्थेच्यामार्फत अंतिम केला जाईल. तर, त्यावरती होणारा खर्च हा पीएमआरडीए उचलणार आहे. याबाबत बोलताना पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी सांगितले, की याबाबतची पहिली बैठक संपन्न झाली आहे. संपूर्ण पीएमआरडीएअंतर्गत असलेल्या हद्दीचे नियोजन ते करणार आहे. तर, निधीची बाजू पीएमआरडीएकडून सांभाळली जाणार आहे.
म्हणून पुण्याला प्राधान्य
केंद्र सरकारच्या 2024 च्या अर्थसंकल्पात 14 ग्रोथ हब शहरांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पुणे, नागपूर, नाशिकचा समावेश आहे. पुण्यात आयटी, मेट्रो, रिंगरोड, औद्योगिक कॉरिडोर्स, शैक्षणिक सुविधा आणि दवाखान्यांमुळे ग्रोथ हबसाठी आदर्श वातावरण आहे. पुण्याचे सकल उत्पन्न 4.2 लाख कोटी असून 2030 पर्यंत 15-18 लाख नोकर्या निर्माण होणार आहेत. यामध्ये 6 लाख महिला कामगार असतील.
पुष्पात तंत्रज्ञान, एआय, इलेक्ट्रिक वाहन, सेमीकंडक्टर डिझाईन, ऑटोमोटिव्ह, एअरोस्पेस, फार्मा क्लस्टरचा विस्तार होत आहे. 800 पेक्षा अधिक उच्च शिक्षण संस्था, मेट्रो, रिंगरोड, पर्यटन आणि स्टार्टअप्ससाठी सुधारित व्यवसाय सुलभतेमुळे पुणे देशातील आघाडीचे आर्थिक केंद्र बनेल.