Accident Pudhari
पिंपरी चिंचवड

Chinchwad Student Accident: चिंचवडमध्ये भीषण अपघात; मिक्सर डंपरच्या धडकेत दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेतून सायकलवर घरी येताना दुर्घटना; चालकाला अटक, अवजड वाहनांवर नियंत्रणाची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : शाळा सुटली, सायकलवर बसून तो नेहमीप्रमाणे घरी निघाला होताः घरात आई त्याची वाट पाहत होती. मात्र, काही मिनिटांतच आलेल्या एका फोनने संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्‌‍वस्त केले. गुरुवारी (दि. 12) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास चिंचवड परिसरात आरएमसी मिक्सर डंपरच्या धडकेत दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.

फारुक शकील तांबोळी (वय 15) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी चालक निवृत्ती उद्धव गिरी (39, रा. पद्मावती रोड, आळंदी, मूळ रा. जालना) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फारुक हा चिंचवडेनगर येथील शिवशाही कॉलनी, भुलेश्वर मंदिराजवळ कुटुंबासह राहत होता. त्याचे वडील शकील आदम तांबोळी (वय 45) हे एका खासगी कंपनीत नोकरी करतात. आई रिझवाना तांबोळी (वय 35), धाकटा भाऊ जोहान (वय 4) आणि फारुक असे चार जणांचे कुटुंब एकत्र राहत होते. कुटुंबाचा आधार असलेला फारुक अभ्यासू, शांत आणि सर्वांशी नम वागणारा म्हणून परिसरात ओळखला जात होता.

फारुक हा प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल, काळभोरनगर, पिंपरी येथे दहावीच्या वर्गात शिकत होता. यंदा बोर्ड परीक्षेचे वर्ष असल्याने तो अभ्यासात विशेष लक्ष देत होता. तो दररोज सकाळी सायकलवरून शाळेत क्लाससाठी जात असे. गुरुवारीही तो सकाळी आठ वाजता नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. त्याचा वर्ग सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत होता. दरम्यान, शाळा सुटल्यानंतर फारुक सायकलवरून घरी परतत असताना साई कॅफे चौक, प्रेमलोक पार्क, चिंचवड येथे हा भीषण अपघात घडला. खंडोबा माळ चौकाकडून चापेकर चौकाच्या दिशेने येणाऱ्या आरएमसी मिक्सर डंपरने त्याच्या सायकलला मागून जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की फारुक काही अंतर फरफटत गेला.

प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या म्हणण्यानुसार, चौकाजवळ स्पीड बेकर असूनही चालकाने वाहनाचा वेग कमी केला नव्हता. धडकेनंतर डंपरचे चाक फारुकच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला फारुक पाहून घटनास्थळी एकच खळबळ उडाली. काही नागरिक आणि ट्रॅफिक वॉर्डन यांनी तत्काळ धाव घेत त्याला तातडीने वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

फोनमुळे पायाखालची वाळू सरकली

दुपारी सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास फारुकचे वडील शकील तांबोळी यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. तुमच्या मुलाचा अपघात झाला आहे, असे सांगत त्या व्यक्तीने शाळेच्या पुस्तकावरील नाव आणि मोबाईल क्रमांक पाहून फोन केल्याचे सांगितले. हा फोन ऐकताच शकील तांबोळी यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी तातडीने पत्नीला सोबत घेत घटनास्थळाकडे धाव घेतली. ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा रस्त्याच्याकडेला मुलाची सायकल, शाळेची बॅग आणि रक्ताचे डाग पाहून ते हादरून गेले. काही क्षणांपूर्वी शाळेतून घरी येणारा मुलगा आता कायमचा निघून गेला आहे, हे लक्षात येताच तांबोळी दाम्पत्याचा आक्रोश अनावर झाला. हे हृदयद्रावक दृश्य पाहून परिसरातील नागरिकही स्तब्ध झाले.

चालक मोबाईलवर मग्न?

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार अपघाताच्या वेळी चालक मोबाईलवर बोलण्यात व्यस्त होता. तसेच, वाहनाचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार, फारुकचे वडील शकील तांबोळी यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी डंपरचालकाविरोधात सदोष मनुष्यवधासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.

पालकांमध्ये चिंता

या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी शहरातील अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित केले आहेत. शाळा सुटण्याच्या वेळेत मोठ्या वाहनांची वर्दळ असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याची भावना पालकांमधून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT