पिंपरी: चिंचवड गावातील कुणाल मार्केट येथील इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेला चार दिवस उलटले, तरी रहिवाशांचा वीज व पाणी पुरवठा बंद असल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. घटनेप्रसंगी शेजाऱ्यांच्या मदतीने, तसेच अग्निशामक दलाचे जवान आणि स्थानिक तरुणांनी मदत केल्याचेही येथील रहिवासी सांगत आहेत. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर ही घटना घडली असून, इतर गोष्टींना प्रसिद्ध देण्याऐवजी आधी रहिवाशांच्या मूलभूत सुविधा पूर्ववत करण्याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी आर्त मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
गुरुवार (दि.२९) ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये आग लागली. या आगीत १८ दुचाकी आणि दोन चारचाकी वाहने जळून खाक झाली. आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर इमारतीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. तसेच इमारतीच्या टेरेसवर अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. या घटनेनंतर अनेक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले. मात्र, चार दिवसांनंतरही रहिवाशांचा वीज व पाणी पुरवठा बंदच आहे.
‘आम्ही स्थानिक तरुणांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी पोहचलो’
आगीच्या घटनेनंतर एका तरुणीने नागरिकांचे प्राण वाचविल्याची चर्चा सुरू झाली असून, तिचा सत्कार अनेकजण करत आहेत. परंतु जे जिवंत आहेत त्यांना काही दुखापत झाली का, चार दिवस झाले आम्ही अंधारात आहोत याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कुणाल मार्केटमधील काही रहिवाशांनी याबाबत वेगळीच भूमिका मांडली आहे. ‘आम्ही स्वतःच्या हिमतीवर, शेजारी आणि मित्रमंडळींच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी पोहोचलो. अग्निशामक दलाचे जवान आणि स्थानिक तरुणांनीही आम्हाला मदत केली,’ असे रहिवाशांचे म्हणणे आहे. काही रहिवाशांनी घटनेप्रसंगीचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचाही दावा केला आहे.
जिन्यामध्ये अंधार, पाण्याविना स्वच्छतागृहे
आगीमुळे इमारतीतील विद्युत व्यवस्था आणि पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. चार दिवस उलटूनही वीज आणि पाणीपुरवठा पूर्ववत झालेला नसल्याने रहिवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. पाणी नसल्याने स्वच्छतागृहांचा वापर करणेही कठीण झाले आहे. पाईपलाईन जळाल्याचे सोसायटीकडून सांगण्यात आले असून, स्वच्छतागृहांमधून दुर्गंधी पसरली आहे. जिन्यांमध्ये वीज नसल्याने अंधाराचे साम्राज्य आहे. आगीच्या धुरामुळे जिन्यांच्या भिंती काळवंडल्या असून, अंधारातून ये-जा करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
ज्येष्ठ नागरिक, रुग्णांचे हाल
या इमारतीमध्ये ज्येष्ठ नागरिक, मधुमेहाचे रुग्ण तसेच कर्करोगाने त्रस्त असलेले नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांना चौथ्या-पाचव्या मजल्यांपर्यंत जिने चढून जाणे आणि खाली उतरणे कठीण झाले आहे. अंधारात पाय घसरून पडण्याची भीती आहे. काही ज्येष्ठ नागरिकांचे नातेवाईक जवळ राहत नसल्याने त्यांना इमारत सोडून अन्यत्र जाणेही शक्य नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रहिवाशांनीच जमा केले प्रत्येकी दहा हजार रुपये
प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संस्थांनी घटनास्थळी भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात पाणी आणि वीज यांसारख्या सुविधा पूर्ववत करण्यासाठी ठोस मदत मिळाली नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. अखेर नागरिकांनीच पुढाकार घेत प्रत्येकाने दहा हजार रुपयांची वर्गणी जमा करून सोसायटीच्या खात्यात पैसे भरले आणि दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून मूलभूत सुविधा पूर्ववत करण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे. दिवाळी तोंडावर असताना नागरिकांना अंधारात आणि पाण्याविना दिवस काढावे लागत आहेत.
आमच्या इमारतीमध्ये ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि लहान मुले राहतात. चार दिवस झाले, तरी पाणी आणि वीजेची व्यवस्था झालेली नाही. स्वच्छतागृहांमध्ये पाणी नसल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. आम्ही स्वतः दहा हजार रुपये जमा करून दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांचा वीज व पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने मदत करावी.मनीषा कळसकर, रहिवासी
आगीच्या घटनेवेळी येथील रहिवाशांनी एकमेकांच्या मदतीने तसेच अग्निशामक दलाचे जवान आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने सुटका करून घेतली. मात्र बचावकार्यावरून कोणाचाही सन्मान करण्यास आमचा विरोध नाही. परंतु त्याआधी येथील रहिवाशांचा वीज व पाणी पुरवठा पूर्ववत करावा. जेणेकरून ऐन दिवाळीत त्यांची गैरसुविधा होणार नाही, याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.डॅा दिनेश खैरे, रहिवासी.