पिंपरी: सध्या टीव्ही व मोबाईलमुळे लहान मुलांचे फिरणे आणि खेळणे बंद झाले आहे. परिणामी, शारीरिक हालचाली कमी होऊन बहुतांश मुलांमध्ये लठ्ठपणा वाढला आहे. त्यामुळे लहानवयातच मधुमेहाची लक्षणे आढळू लागली आहेत. डॉक्टरांच्या तपासणीमध्ये दहा वर्षांच्या आतील मुलांना टाईप २ मधुमेह झाल्याचे आढळले. याचे कारण साखर घातलेले पेय तसेच पॅकेज्ड फूड, प्रोसेस फुड खाल्ल्यामुळे लहानवयात अशी अवस्था होत आहे. मधुमेहावर वेळीच कृती हे घोषवाक्य आरोग्य संघटनेने दिले आहे. मधुमेह होऊन उपचार करण्यापेक्षा तो आधीच ओळखा आणि उपचार करा, असे आवाहन आरोग्य तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.
पूर्वी मोठ्यांचा आजार समजला जाणारा टाईप - २ मधुमेह आता लहान मुलांमध्येही दिसू लागला आहे. देशात शाळेत जाणाऱ्या १४ पैकी १ मुल लठ्ठ आहे. १० ते १९ वयोगटात मधुमेहाचं प्रमाण २ टक्के तर मोठ्या शहरामध्ये ३ ते ४ टक्क्यापर्यंत गेलं आहे. १० पैकी १ मूल प्री - डायबिटीसच्या टप्प्यावर आहे. याचं मुख्य कारण म्हणजे जंकफूड, कोल्ड्रिंक्स. मोबाईल आणि मैदानी खेळाचा आभाव आहे, असे डॉक्टर सांगतात.
सध्याच्या परिस्थितीत मुलांचे जंकफूड खाण्याचे प्रमाण वाढताना दिसतेय. कित्येकदा काही बनवून देण्याचा कंटाळा असो किंवा वेळेची कमतरता या सर्व गोष्टींचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. नोकरदार महिलावर्गाला वेळेअभावी मुलांना घरात अन्नपदार्थ बनवून देता येत नाहीत, म्हणून त्यावर जंकफूडचा आधार घेतला जातो. मुलांना चमचमीत पदार्थ खाण्याची जास्तच उत्सुकता असते, त्यामुळे साहजिकच त्यांची पावले मंच्युरियन, पिज्झा, बर्गर खाण्याकडे वळतात. जेली, कोल्डड्रिंक्स, चायनीज फूड, पिझ्झा, बर्गर, चिप्स, समोसे असे पदार्थ बाहेर सहज मिळत असल्यामुळे हे खाण्याकडे मुलांचा ओढा वाढत आहे. मात्र, या ओढ्याबरोबर जीवघेण्या आजारांना लहानपणीच तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र आहे.
चॉकलेट, पिझ्झा, केक आहाराचा भाग
सध्या चॉकलेट, पिझ्झा, बर्गर आणि केक ही मुलांची दररोजची आहारशैली बनली आहे. यातील एक तरी पदार्थ रोज हवाच. यामागचे दुष्परिणाम माहिती असले तरी या गोष्टी खायला देण्यात पालकही आघाडीवर असतात. त्यामुळे घरातील सकस अन्न मुले खात नाहीत. तसेच आई-वडील दोघेही नोकरी करत असल्याने मुलांच्या आहाराकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे भूक लागल्यावर रेडिमेड खाद्यपदार्थांवर मुले ताव मारतात.
पॅकेज्ड फूड खाणे रोजची सवय
वय वर्षे ३ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांची पॅकेज्ड फूड खाणे ही लाईफ स्टाईल बनली आहे. पालकांना गांभीर्य कळूनही हट्टापायी पॅकेज्ड फूड खाण्यासाठी पैसे पुरवितात. यामध्ये वेगवेगळ्या फ्लेवर्सचे चिप्स, कुरकुरे, चीज बॉल्स असे खाद्यपदार्थ लहान मुले खातात. यामध्ये मीठ व साखरेचे प्रमाण अधिक असल्याने हे खाल्ल्याने लहानवयातच गरजेपेक्षा मीठ व साखर शरीरात जाते. यांच्या सेवनाने कॅलरिज, न्यूट्रिशन्स, व्हिटॅमिन्स हे घटक मिळत नाहीत. पॅकेट फूडचा उलट परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असतो. त्यात शरीराची योग्य वाढ न होणे, वजन वाढणे अशा विविध समस्या उद्भवतात. जंक फूडच्या रोजच्या सेवनाने कालांतराने यकृतावरही परिणाम होण्याची शक्यता असते.
संपूर्ण देशात १ ते १० वर्षाच्या आतील मुलांमध्ये ३ लाख १ हजार मुलांमध्ये टाईप १ मधुमेहाचे प्रमाण आढळते. तर १० ते २० वयोगटातील ८ टक्के मुलांमध्ये टाईप २ मधुमेहदेखील आढळतो. हे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढलेले आहे. यामध्ये मुलांना दोष न लावता त्याचा आहार, व्यायाम याकडे लक्ष दिले जाते आणि ताणतणावापासून त्याला मुक्त ठेवावे लागते. वजन जास्त असेल तर वजन कमी करणे या गोष्टीकडे प्राधान्याने पाहिल्या जातात.डॉ. अनु गायकवाड, मधुमेह तज्ज्ञ
टाइप २ मधुमेह हा आम्ही ५० ते ६० वर्षाच्या पुढील व्यक्तीमध्ये पहायचो. तो आता ८ वर्षाच्या मुलांमध्येदेखील आढळत आहे. सध्या हे प्रमाण वाढत आहे. मुलांमधील टाईप २ हा मधुमेह बरा होण्याची शक्यता असते. पण टाईप १ मधुमेहात इन्सुलिन द्यावे लागते. त्याचे प्रमाण त्या व्यक्तीवर अवलंबून असते.डॉ. चंद्रकांत कणसे मधुमेह तज्ज्ञ