पिंपरी: मागील निवडणुकीत या प्रभागात माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे पॅनेल विजयी झाले होते. त्यात माजी नगरसेवक संजय नेवाळे, माजी नगरसेविका अश्विनी बोबडे, योगिता नागरगोजे यांचा समावेश होता. मात्र, मूळ पॅनेलला डावलून इतर पक्षातून आलेल्या इच्छुकांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात येत असल्याने गोंधळाची स्थिती आहे. परिणामी, विरोधकांना विजयाची आयती संधी उपलब्ध झाल्याचे चित्र आहे.
माजी नगरसेवक संजय नेवाळे व अश्विनी बोबडे यांनी राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये प्रवेश केला आहे. प्रभागात भाजपाचे चिखली प्रभाग क्रमांक 1 चे माजी नगरसेवक कुंदळ गायकवाड तसेच, ऐश्वर्या एकनाथ पवार, सचिन सानप, सचिन जरे, अजय पाताडे, मनाली पाताडे, रिटा सानप, नीलेश नेवाळे, काशिनाथ जगताप, विशाल कसबे, पांडुरंग ठाकूर, निशा यादव, शीतल ठाकूर, ज्योती धेंडे, तुषार सोनवणे, कविता पाडुळे, सुनीता जगताप, भारती मगर, कविता हिंगे, सोनाली हजारे, गणेश भंडलकर, शशिकांत जगताप, गणेश भंडलकर, गोरख पाटील, सुरेश जाधव, मारुती जाधव, राजू खंडाळे, युवराज कोकाटा, जितेंद्र छाबरा, हिरामण खवले, विठ्ठल शिंदे, सारिका पवार, सखाराम मटकर, संतोष शेंडगे, संतोष यादव, छाया शेळके, शोभा खंडागळे, विनोद रोकडे आदी इच्छुक आहेत. भाजपाच्या माजी नगरसवेकांनी पक्ष बदलल्याने प्रभागाचे समीकरण बदलले आहे. भाजपाने नवे पर्यायी उमेदवार देण्याचा नियोजन केले आहे. भाजपाचे निष्ठावंत नाराज आहेत. भाजपाला बंडखोरीचा सामना करावा लागू शकतो. भाजपाला यंदा संपूर्ण पॅनेल राखता येणार का, त्यांचा विरोधकांना लाभ मिळणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रभागातील परिसर
नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती, कुदळवाडी भाग, कृष्णानगर, शरदनगर, कोयनानगर, महात्मा फुलेनगर, पूर्णानगर, शिवाजी पार्क, शिवतेजनगर, म्हेत्रे वस्ती, चिखली घरकुल प्रकल्प, अजंठानगर, दुर्गानगर आदी
अटल बिहारी वाजपेयी उद्यानामुळे महापालिकेस मोठा महसूल
खाणीचा विकास करून अटल बिहारी वाजपेयी हे आकर्षक उद्यान उभारण्यात आले आहे. या उद्यानाच्या प्रवेश तिकिटातून महापालिकेस सर्वांधिक उत्पन्न मिळत आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय क्रीडा संकुल विकसित करण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. शिवतेजनगर येथे सांस्कृतिक हॉल बांधण्यात आला आहे. घरकुल परिसरात सांस्कृतिक भवन बांधण्यात आले आहे.
पूर्णानगर येथे प्रमोदजी महाजन हॉल विकसित केला आहे. कृष्णानगर, महात्मा फुलेनगर, पूर्णानगर भागांत काँक्रीटचे रस्ते बनविण्यात आले आहे. आवश्यक ठिकाणी पाण्याची वाहिनी तसेच, ड्रेनेज लाईन टाकण्यात आली आहे. वीजपुरवठा खंडित होऊ नये, म्हणून फीडर उभारण्यात आले आहेत. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी घरकुल चौकात सुशोभिकरण करण्यात आले आहे.
प्रभागातील जागांचे आरक्षण
अ-एससी
ब-ओबीसी महिला
क-सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
चिखली घरकुलात शिरते पावसाचे पाणी
सर्वसामान्य, कामगार, मध्यवर्गीय, उच्चशिक्षित असा हा संमिश्र प्रभाग आहे. प्रभागात पीएमआरडीएचा सर्वांधिक परिसर आहे. या भागांतील मोकळ्या जागा व शेतीच्या जागेत नव्याने हाऊसिंग सोसायट्या निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरी सुविधांचा ताण वाढत आहे. काही भागांत पाणी कमी दाबाने येते. महापालिकेने उभारलेल्या चिखली येथील घरकुल प्रकल्पात पावसाचे पाणी शिरून तेथील रहिवाशांची गैरसोय होते. तेथे गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. विक्रेते, दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने रस्ते अरुंद होऊन वाहतूककोंडी होत आहे.