चऱ्होली: काही दिवसांपूर्वी चऱ्होली बुद्रुक आणि चऱ्होली खुर्द सीमेवर नदीकाठी आणि सोसायट्याच्या परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते. काही दिवस बिबट्या दिसून आला नाही; परंतु पुन्हा बिबट्याने चऱ्होलीत धुमाकूळ घातल्याने येथील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत.
बिबट्याने आमच्या घराजवळच पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. त्यामुळे आता घराबाहेर पडणेदेखील धोक्याचे वाटू लागले आहे. घराच्या आजूबाजूला शेती आहे. घर आणि शेती सोडून तर जाता येत नाही आणि बिबट्याची भीती देखील आहेच. त्यामुळे वनविभागाने लवकरात लवकर उपाययोजना करावी.अमोल कुडले, शेतकरी, चऱ्होली
नदीच्या कडेला किंवा गावाच्या शिवेवर दाट गर्द झाडाझुडपांदरम्यान आढळणारा बिबट्या आता खुलेआम वाड्यावस्त्यांवर, घरापर्यंत येऊ लागला आहे. त्यामुळे सध्या चऱ्होलीकरांची रात्र वैऱ्याची झाली आहे. दिवसभर पोटापाण्यासाठी कामकाज करायचे आणि रात्रीच्या वेळी घरादाराजवळ बांधलेली जनावरे, कुत्री तसेच लहान मुलांची राखण करण्याची वेळ चऱ्होलीकरांवर आली आहे.
बिबट्या सतत जागा बदलत आहे. विविध ठिकाणी बिबट्या दिसत असल्यामुळे पिंजरा लावणे शक्य होत नाही. नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. शक्य त्या ठिकाणी आम्ही उपायोजना करत आहोत.विनायक बडदे, वनविभाग अधिकारी
चऱ्होली गावातील मुख्य चौक असणाऱ्या श्री वाघेश्वर महाराज चौकापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर चऱ्होली निरगुडी रस्त्यावर भोसलेवस्ती या ठिकाणी बिबट्याने दस्तक दिली. अमोल कुडले यांच्या घराच्या आजूबाजूला सर्वत्र ऊस आणि इतर पिके असून मुख्य रस्त्यापासून घर काही अंतरावर शेतात आहे. रानवस्ती असल्यामुळे कुडले यांनी संरक्षणासाठी दोन कुत्रे पाळले आहेत. त्यातील एका कुत्र्यावर काल रात्री बिबट्याने हल्ला केला. सकाळी कुत्रा दिसत नसल्याने कुडले त्यांनी आजूबाजूला फिरून हाक मारली असता आणि घरामागे जाऊन बघितले असता त्या ठिकाणी शेताला पाणी दिलेले असल्यामुळे बिबट्याचे पंजाच्या ठशांच्या खुणा आढळून आल्या. तसेच कुत्र्याचे रक्त सांडलेले दिसले.
चऱ्होली परिसरात बिबट्याचे अस्तित्व आहे. विविध वाड्यावस्त्यांवर सतत बिबट्या दिसत आहे. तरी वनविभागाने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.नितीन काळजे, माजी महापौर, मनपा
बिबट मादीचे पिल्लांसह दर्शन
सध्या चऱ्होलीच्या विविध भागांमध्ये बिबट्याचे दर्शन होत आहे. माळी पेठा, बुर्डे वस्ती, पठारे मळा, भोसले वस्ती या सर्व वस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर शेती आहे. तसेच दाट झाडाझुडपात बिबट्याला लपण्यासाठी जागा आहे. त्यामुळे या सर्व वस्त्यांवर बिबट मादी आणि दोन पिल्लांचे दर्शन लोकांना होत आहे. बिबट्याला बघून नागरिक शेतातील काम सोडून पळ काढत आहेत.
बिबट्याच्या भीतीने चऱ्होलीतील सर्व आर्थिक व्यवहारावर व व्यवसायांवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे वन विभागाने नागरिकांचे सहकार्याने उपाययोजना अमलात आणावी.प्रवीण काळजे, मा. संचालक, संत तुकाराम कारखाना