चऱ्होली: चऱ्होली परिसरात मागील काही महिन्यांपासून बिबट्याचा दोन बछड्यांसह वावर सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक दहशतीखाली वावरत आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी चऱ्होली खुर्द परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर आजूबाजूला असलेल्या उसाच्या शेतीचा आधार घेत बिबट्याची मादी तिच्या दोन बछड्यांसह आळंदी, डुडूळगाव, केळगाव, वडमुखवाडी, चोवीसावाडीसह चऱ्होली बुद्रुक परिसरात मुक्काम ठोकून आहे. (Latest Pimpri chinchwad News)
कित्येक नागरिकांनी बिबट्याला भिंतीवर आणि झाडावर बसलेला बघितला आहे. परिसरातील जनावरे गायब होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये आणखीनच भीती वाढली आहे.
विशेषतः चऱ्होलीच्या मुख्य रस्ता असणाऱ्या एअरपोर्ट रोडवरून जाताना तनिष ऑर्चिड सोसायटीच्या समोरील रस्त्याने पुढे गेल्यावर राही कस्तुरी, ग्लोबल सोसायटीच्या परिसरात या बिबट्याचा वावर आहे. तनिष अर्चिडपासून पुढे गेल्यावर हा रस्ता बराचसा निर्मनुष्य आहे आणि या रस्त्यावर बराचसा अंधार देखील असतो. परिसरात मोठ्या प्रमाणावर उसाची शेती आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी बिबट्या उसाच्या शेतीचा आधार घेऊन आजूबाजूच्या परिसरात फिरत असतो.
बिबट्याच्या मादीबरोबर दोन बछडे असल्यामुळे ही मादी कधी रौद्ररूप धारण करेल सांगता येत नाही. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने लवकरात लवकर पिंजरा लावून मादीसह बछड्यांना जेरबंद करावे, अशी मागणी केली आहे.
चऱ्होली परिसरात गेली किती दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. विविध ठिकाणाहून सतत बिबट्याला बघितल्याच्या बातम्या तसेच बिबट्याच्या अस्तित्वाच्या खुणा जागोजागी दिसत आहेत. त्यामुळे गावात सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. यावर त्वरित उपाय करण्यात यावा ही विनंती.- सचिन भुजबळ, चऱ्होली ग्रामस्थ
गेली अनेक दिवसांपासून चऱ्होली परिसरात बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे नागरिकांना सतत दहशतीखाली राहावे लागत आहे. वन विभागाने लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा.- राजेंद्र वनारसे, स्थानिक रहिवासी
चऱ्होलीतील अनेक सोसायटीच्या शेजारीच ऊसशेती असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये जास्त चिंतेचे वातावरण आहे. या ठिकाणी वावरताना सतत बिबट्याच्या अस्तित्वाची जाणीव होत राहते. त्यामुळे वनविभागाने लवकरात लवकर कारवाई करावी.- सतीश सरदेसाई, स्थानिक रहिवासी