

पिंपरी: स्मार्ट सिटी असलेले पिंपरी-चिंचवड हे हवेच्या खराब गुणवत्तेत अग्रेसर होत आहे. शहरातील हवेच्या गुणवत्तेची पातळी ही 0 ते 50 असायला पाहिजे. पण ती मार्चअखेर 131 पर्यंत वाढली आहे. त्यातून श्वसनविकाराचा धोका वाढत आहे. तसेच, अस्थमा, सीओपीडी, इतर फुप्फुसांच्या विकार असलेल्या रुग्णांना याचा मोठा त्रास होतो. शहरामध्ये 2378 श्वसन विकाराचे रुग्ण आढळले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील वायु प्रदुषणातील काही प्रदुषके हे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्धारित केलेल्या विहित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहेत. वाढते शहरीकरण, औद्योगिक क्षेत्र, वाहनांची वाढती संख्या आदी बाबी हवा प्रदषणासाठी कारणीभूत आहेत. (Latest Pimpri chinchwad News)
महापलिकेच्या पर्यावरण अहवालात दिलेल्या माहितीनुसार 2024 ते मार्च 2025 पर्यंत हवेच्या गणुवत्तेची पातळी 313 इतकी नोंदण्यात आली आहे. त्यामुळे ही हवा मध्यम प्रदूषित श्रेणीमध्ये गेली आहे. अशा हवेमुळे फुफ्फुस, हृदयविकार, मुले आणि वृद्धांना श्वास घेण्यास त्रास होतो. अगदी दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास श्वसनाचे विकास होतात.
मानवाच्या आरोग्यावर पर्यावरणाचे चांगले व विपरीत परिणाम होत असतात. योग्य आहार आणि स्वच्छ पर्यावरण यामुळे आयुष्य वाढते तर प्रदूषणामुळे प्रकृती खालावते. जगातील एक चतुर्थांश आजार व मुलांना होणारे एक तृतीयांश आजार पर्यावरणीय कारणांमुळे उद्भवतात.
पर्यावरण अहवालात वाढत्या वाहतूक कोंडीमुळे यहरातील तरंगणारे धुलिकण तसेच नायट्रोजन ऑक्साईड या प्रदूषित घटकांच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे अधोरेखित केले आहे.पिंपरी-चिंचवडचा विचार करता खराब रस्ते, बांधकाम, औद्योगिक आणि शहरी कचरा जाळण्याचे प्रकार व त्यातच कमी झालेले हरित क्षेत्र व ढासळलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पिंपरी चिंचवडकरांचा श्वास कोंडत आहे. शहरातील काही भागात प्रदूषणामुळे पिंपरी-चिंचवडची हवा खराब श्रेणीत गेल्याचे दिसून येत आहे.
हवा गुणवत्ता निर्देशांक 50 पर्यंत असणे आवश्यक आहे. त्यापेक्षा अधिक प्रदूषण वाढल्यास त्याचे आरोग्यावर परिणाम होतात. शहरातील काही भागात मागील काही दिवसात हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 100 च्या पुढे जवळपास नोंदवला गेला. पर्यावरण प्रेमींकडून हवा प्रदूषण कमी करण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरत असून केलेल्या उपाययोजना नावालाच असल्याचा आरोप होत आहे.
पिंपरी चिंचवडचा विचार करता खराब रस्ते, बांधकाम, अनियंत्रित आरएमसी प्लान्ट, औद्योगिक आणि शहरी कचरा जाळण्याचे प्रकार व त्यातच कमी झालेले हरित क्षेत्र व ढासळलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही हवा प्रदूषित होण्याची कारणे आहेत. मनपाने करोडो रूपये खर्च करून चुकीच्या यंत्रणा राबविल्या आहेत.
प्रशांत राऊळ (ग्रीन आर्मी, पर्यावरणप्रेमी)