Footpath Pipes Pudhari
पिंपरी चिंचवड

Charholi Footpath Pipes: आळंदी–देहू मार्गावरील पदपथावर महिन्यांपासून पाण्याचे पाईप, नागरिक त्रस्त

चऱ्होली परिसरात महापालिकेचे दुर्लक्ष; वारकरी, पादचारी आणि वाहनचालकांत भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

चऱ्होली: तीर्थक्षेत्र आळंदी आणि देहू यांना जोडणार्ऱ्या मार्गावरील पदपथावर मागील कित्येक महिन्यांपासून पाण्याच्या पाईप पडून आहेत. याकडे पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पादचारी नागरिक, वाहनचालक तसेच वारकरी यांना त्रास सहन करावा लागत आहे. हे पाईप पदपथावर, रस्त्यात टाकल्याने हा रस्ता आहे की पाईपचे गोडाऊन, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

आळंदी, मोशी रस्त्यावर डुडुळगावपासून हवालदार वस्ती चौकापर्यंत आळंदीकडून मोशीकडे जाताना डाव्या हाताच्या पदपथावर सर्वत्र शीग लावून ठेवलेले पाईपांचे ढीग दृष्टीस पडतात. या पाईपच्या ढिगांमुळे पदपथाचे रूपांतर गोडाऊनमध्ये झाले आहे. ना खेद ना खंत अशा पद्धतीने सरकारी यंत्रणांनी मागील अनेक दिवसांपासून डुडुळगावमधील पदपथांवर राजरोसपणे पाण्याच्या लाईनसाठी उपयोगी असणारे साधारण 500 मिलिमीटर व्यासाचे आणि साधारण 12 ते 15 फूट लांबीचे लोखंडी पाईप पदापथावरती अस्ताव्यस्त स्वरूपात ठेवलेले आहेत. काही पाईप पदपथाच्या आतल्या बाजूला आहेत. काही ठिकाणी पूर्ण पदपथ गिळंकृत केला आहे. काही पाईप पदपथाला लागून रस्त्यावरच ठेवलेले आहेत.

जर पाईपलाईनचे काम चालू आहे आणि अशा परिस्थितीत जर पदपथावर पाईप ठेवले असतील तर आपण अडचण समजू शकतो. मात्र, आजूबाजूला कुठेही पाईपलाईनचे काम सुरू नाही. मात्र, तरीही मागील कित्येक महिन्यांपासून या ठिकाणी पाईप असेच पडलेले आहेत.

साफसफाईला येतोय अडथळा

या अस्ताव्यस्त स्वरूपात पडलेल्या पाईपमुळे संपूर्ण पदपथ अडवला गेला आहे. हे पाईप पदपथावर ठेवले गेल्यामुळे झाडलोट करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना पदपथ व्यवस्थित झाडता येत नाहीत. त्यामुळे या पदपथांवर प्रचंड घाण साचलेली आहे. या पाईपमधूनदेखील मोठ्या प्रमाणावर घाण साचलेली आहे. दगड, गोटे, प्लॅस्टिकच्या बाटल्या तसेच फाटके कपडे या ठिकाणी असेच पाईपमधून टाकण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांना हक्काचा निवारा म्हणून या पाईपचा उपयोग होतो. कधी कधी दारू प्राशन केलेल्या मद्यपींना या ठिकाणी आडोसा घेता येतो. त्यामुळे या पाईप शेजारून जाणाऱ्या वाटसरूंना आणि आजूबाजूच्या नागरिकांना सतत भीतीच्या छायेखाली राहावे लागते.

प्रशासकीय अधिकाऱ्यांचे एकमेकांकडे बोट

प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असताअधिकारी एकमेकांकडे बोट दाखवतात. महापालिकेचे अधिकारी या रिकाम्या पाईपसंबंधी अनभिज्ञ आहेत.पर्यावरण, पाणीपुरवठा, स्थापत्य यापैकी कोणीही या पाईपची जबाबदारी घेत नाही. एक तर सरकारी अधिकारी नवीन आहेत. त्यांना त्याबद्दल काहीच माहिती नाही. त्यामुळे फक्त टोलवाटोलवी केली जाते आणि एकमेकांकडे बोट दाखवले जात आहे. यामुळे महापालिका हद्दीतील हे पाईप नेमके कशासाठी आणि कोणी टाकले आहेत, याबाबत नागरिकांना प्रश्न आहे.

बिबट्याच्या हल्ल्याची भीती

आळंदी-मोशी रस्ता हा डोंगराच्या बाजूने जातो. नेमका डावीकडील रस्ता डोंगराच्या बाजूने जात असताना त्याच बाजूला नेमके पाईप रचून ठेवलेले आहेत. या डोंगरांवर दाट झाडी असून, या ठिकाणी बिबट्यांना लपण्यासाठी भरपूर जागा आहे. या पाईपमधून कुत्रे बसलेले असतात. कुत्र्यांची शिकार करण्यासाठी जर बिबट्याने या पाईपमधून अडोसा शोधला तर करायचे काय? रात्रीच्या वेळी सहज शेजारून जाणाऱ्या नागरिकांवर हल्ला करता येईल. त्यामुळे नागरिक भयभीत आहेत.

सदर पाईप हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वाघोली यांच्या अखत्यारीत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होत नसल्यामुळे पाईपबद्दल निर्णय घेता येत नाही. तसेच इतके मोठे पाईप दुसरीकडे नेण्याची व ठेवण्याची यंत्रणा आणि व्यवस्था आपल्याकडे नसल्यामुळे पदपथ पाईपमुक्त करणे अवघड बनले आहे.
प्रवीण लांडे, अतिक्रमण विभाग, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT