पुणे जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसाने बुधवारी (दि.28) थोडीशी उघडीप देत, नागरिकांना दिलासा दिला. मात्र, हिंजवडी आयटी पार्क परिसरात झालेल्या सलग वाहतूक कोंडीमुळे नागरिक आणि वाटसरु पुन्हा एकदा त्रस्त झाले आहेत. या परिसरात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे अनेक नागरिकांची पुर्वनियोजित कामे खोंबळल्याने प्रशासानाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
पावसाने दिलेला दिलासा आणि आवश्यक कामांसाठी घराबाहेर निघालेल्या नागरिकांची गाठ नित्याच्याच असलेल्या वाहतूक कोंडीशी झाली. परिणामी हिंजवडी येथील शिवाजी चौक ते फेज थ्री पर्यंतच्या केवळ आठ किलोमीटरच्या रस्त्यासाठी तब्बल ३५-४० मिनिटांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे घोटावडे, चांदे, नांदे, मूलखेड, पिरंगुट, पौड, मुळशी सारख्या भागातून येणारी वाहने देखील तासभर या वाहतूक कोंडीत अडकली. त्यामुळे आयटीच्या रस्त्यांची पुन्हा एकदा पोलखोल झाली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची ही समस्या मोठी होत आहे.
आयटी मधील सर्वात महत्वाच्या असलेला शिवाजी चौक ते फेज 3 पर्यंतचा रस्ता अतिशय वर्दळीचा झाला आहे. मात्र सध्या या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचलेले असते. त्यामुळे वागतुक अतिशय संथ गतीने होते. मात्र यातही काही उपयाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. विशेषतः ज्या ठिकाणी मेट्रोचे ट्रॅक टाकण्यात आले आहेत, आणि जिथे काम पूर्णत्वास आले आहे. अशा ठिकाणी लावण्यात आलेले सिमेंटचे ब्लॉक आणि बॅरिगेट्स काढल्यास वाहतूक कोंडी कमी होईल आणि वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. अशी नागरिकांची मते आहेत.