चाकण : चाकण-तळेगाव रस्त्यावर पायी कामावर निघालेल्या व्यक्तिला भरधाव मोटारीने धडक दिली. यात संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि. ७० सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
गजानन अरुण टाले (वय ४५, सध्या रा. खराबवाडी, मूळ रा. अमरावती) असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते रविवारी नेहमीप्रमाणे पायी कंपनीत निघाले होते. त्यावेळी त्यांना खराबवाडी गावाच्या हद्दीत अग्रवाल कंपनीसमोर अज्ञात मोटारचालकाने धडक देऊन पुढे पसार झाला.
या अपघातात गजानन अरुण टाले हे गंभीर जखमी झाले होते. काही कामगारांनी त्यांना चाकण तळेगाव चौक येथील एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ते चाकण एमआयडीसी मधील इलेक्ट्रॉ न्यूमॅटिक कंपनी खराबवाडी येथे नोकरीस होते. महाळुंगे पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.