पिंपरी: दारूच्या नशेत वाहन चालविण्यास मज्जाव केल्याने एका तरुणाने मित्रावर बिअरच्या बाटलीने जीवघेणा हल्ला केला. त्या वेळी मित्रानेही तरुणावर बिअरच्या बाटलीने हल्ला केला. याप्रकरणात परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना रविवारी (दि. 8) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास चाकण येथील वैदुवाडी, बालाजीनगर येथील पार्किंग ग््रााऊंड जवळ घडली.
पहिल्या प्रकरणात नागेश बळीराम चिम रा. बालाजीनगर, वैदुवाडी, खेड) यांनी चाकण दक्षिण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सचिन श्रीराम आरेकर (23, रा. बालाजीनगर, खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या रुग्णालयात दाखल आहे. फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत.
घटनेच्या वेळी आरोपीने जास्त दारू पिली होती, त्यामुळे फिर्यादीने त्याला ‘तू गाडी चालवू नको’ असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने ‘तू मला सांगणारा कोण? तुला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिली आणि कारमधील बिअरची बाटली काढून फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर दुखापत केली.
याच्या परस्पर विरोधात सचिन श्रीराम आरेकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नागेश बळीराम चिम याला पोलिसांनी अटक केली आहे. सचिन, नागेश आणि मित्र एकत्र दारू प्यायल्यानंतर सचिन आपली गाडी घेऊन जात असताना आरोपीने त्यांना हटकले. ‘तुला मस्ती आली आहे का, तुला जिवंत सोडत नाही‘ असे म्हणून आरोपीने हातातील बिअरची बाटली फिर्यादीच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादीने डोके बाजूला केल्याने बाटली त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर लागली. यामध्ये फिर्यादीच्या हाताची शिर तुटल्याने त्यांना गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चाकण दक्षिण पोलिस तपास करत आहेत.