Brahminy Duck Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Brahminy Duck Sighting: ताथवडे घाटावर दुर्मिळ ब्राह्मणी बदकांच्या जोडीचे आगमन; पक्षीप्रेमींमध्ये उत्साह

परदेशातून स्थलांतरित पाहुण्या बदकांचे दररोज सकाळी दर्शन; पर्यावरणीय समतोलाचे सकारात्मक द्योतक, नागरिकांना संरक्षणाचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: परदेशातून स्थलांतर करून आलेल्या पाहुण्या ब्राह्मणी बदक या दुर्मिळ व आकर्षक बदकाच्या जोडीचे दर्शन ताथवडे घाट येथे सध्या दररोज सकाळी नागरिकांना घडत आहे. शांत पाणवठे, हिरवळ आणि कमी मानवी हस्तक्षेप असलेला ताथवडे घाट हा या पाहुण्या पक्ष्यांसाठी काही काळाचा सुरक्षित आसरा ठरत असल्याचे दिसून येते.

या बदकांची जोडी सकाळच्या वेळी पाण्याजवळ निवांतपणे विहार करताना नागरिकांना आढळून येत आहे. त्यांच्या केशरी-तपकिरी रंगछटा, पांढुरके डोके आणि काळी शेपटी यामुळे हे पक्षी नागरिकांचे मनमोहून घेत आहेत. अशा स्थलांतरित पक्ष्यांचे दर्शन होणे हे परिसरातील पर्यावरणीय समतोल व जैवविविधतेचे सकारात्मक द्योतक मानले जाते, असे पक्षीनिरीक्षक शुभम पांडे यांनी सांगितले.

ताथवडे घाटावर जोडीचे दर्शन होणे ही आनंददायी बाब असली, तरी त्यांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक नागरिकांनी व पर्यटकांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. पक्ष्यांना त्रास न देणे, आवाज, प्लास्टिक व कचरा टाळणे, नैसर्गिक अधिवास जपणे अशा स्थलांतरित पक्ष्यांचे स्वागत करून त्यांचे संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे आवाहन पक्षीनिरीक्षक करत आहेत.

स्थलांतर, अधिवास

हे पक्षी मुख्यतः मध्य आशिया, तिबेट, मंगोलिया, रशिया आणि युरोपातील काही भागांत आढळतात. हिवाळ्यात थंडीपासून बचावासाठी हे पक्षी भारतात स्थलांतर करतात. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश तसेच उत्तर भारतातील जलाशय, नद्या, तलाव व ओढ्यांच्या काठावर हे दिसून येतात.

ओळख, वैशिष्ट्ये

शरीरावर केशरी-तपकिरी रंग, डोके फिकट पांढरे/क्रीम रंगाचे, पंखांवर उडताना पांढरा पट्टा स्पष्ट दिसतो. नर व मादी दिसायला जवळपास सारखे,मात्र नराच्या मानेजवळ काळसर पट्टा असतो

आहार

ब्राह्मणी बदक सर्वभक्षी आहेत. त्यांच्या आहारात जलवनस्पती, गवत व बिया, कीटक, लहान जलजीव यांचा समावेश होतो.

प्रजनन

हे बदक प्रामुख्याने खडकांच्या कपारी, झाडांच्या पोकळ्या किंवा निर्जन जागी घरटी बांधतात. जोडी आयुष्यभर एकत्र राहते, हे यांचे खास वैशिष्ट्य आहे.

पर्यावरणीय महत्त्व

जलपरिसंस्थेतील समतोल राखण्यास मदत करतात. कीटकभक्ष्यी असल्याने कीटकांच्या संख्या नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT