Cyber Fraud Pudhari
पिंपरी चिंचवड

Boss Fraud WhatsApp Scam: बॉसच्या व्हॉट्सॲपवरून मेसेज अन् खात्यातून पैसे गायब! ‘सीईओ फ्रॉड’पासून सावध राहा

वरिष्ठांच्या नावाने तातडीने पैसे पाठविण्याचे संदेश; बनावट व्हॉट्सॲप खाते, मालवेअर आणि एआयच्या मदतीने फसवणूक, पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांचे सतर्कतेचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: ‘मी महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे. एका व्यक्तीला तातडीने पैसे पाठवायचे आहेत. दिलेल्या बँक खात्यावर रक्कम ट्रान्स्फर करा,’ असा मेसेज थेट बॉसच्या व्हॉट्सॲपवरून येतो. वरिष्ठांचा आदेश असल्याने कर्मचारी खातरजमा न करता पैसे पाठवतात. मात्र, काही वेळाने प्रत्यक्ष बॉसशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी असा कोणताही मेसेज पाठवला नसल्याचे समोर येते. तोपर्यंत रक्कम सायबर चोरट्यांच्या खात्यात जमा झालेली असते. सायबर गुन्हेगारीतील या पद्धतीला ‘बॉस फ्रॉड’ किंवा ‘सीईओ फ्रॉड’ म्हटले जाते. फसवणूक करण्याच्या या प्रकारामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

सायबर चोरटे सुरुवातीला कंपनीचे संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डिजिटल संपर्क व्यवस्थेत शिरकाव करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी रिझर्व्ह बँक, कंपनी व्यवहार मंत्रालय किंवा अन्य सरकारी यंत्रणेच्या नावाने बनावट ई-मेल अथवा संदेश पाठवले जातात. त्यासोबत महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे भासवून झिप फाइल जोडलेली असते. संबंधित व्यक्तीने संगणकावर ही फाइल उघल्यास मालवेअरच्या माध्यमातून संगणकावरील व्हॉट्स ॲप वेब चोरट्यांच्या ताब्यात जाते. त्यामुळे प्रत्येक प्रकरणात बॉसचा मोबाईल प्रत्यक्ष हॅक झालेला असतोच असे नाही. संगणकावरील व्हॉट्स ॲप वेब ताब्यात घेऊनही फसवणूक केली जाऊ शकते.

अशी आहे चोरट्यांची मोड्स‌

वरिष्ठांच्या व्हॉट्स ॲप खात्यात प्रवेश मिळाल्यानंतर चोरटे कार्यालयातील आर्थिक व्यवहार हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवड करतात. पुरवठादाराचे बिल थकले आहे, कंपनीचा महत्त्वाचा व्यवहार अडकला आहे किंवा तातडीने रक्कम जमा करणे आवश्यक आहे, अशी कारणे पुढे केली जातात. त्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यांचे तपशील पाठवले जातात. व्यवहार गोपनीय ठेवण्यास सांगणे, फोनवर बोलण्यास टाळाटाळ करणे आणि ठराविक वेळेत पैसे पाठविण्याचा आग्रह धरणे, अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जातो. काही प्रकरणांत एकाच वेळी संपूर्ण रक्कम न मागता वेगवेगळ्या खात्यांवर टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्यास सांगितले जाऊ शकते.

बनावट व्हॉटस्ॲप खात्याचाही वापर

या फसवणुकीत प्रत्येक वेळी वरिष्ठांचे मूळ व्हॉटस् ॲप खाते ताब्यात घेतले जातेच असे नाही. काही वेळा त्यांचा फोटो, नाव आणि पदाचा वापर करून बनावट खाते तयार केले जाते. कंपनीच्या नावाशी साधर्म्य असलेले बनावट ई-मेल पत्ते तयार करूनही आर्थिक व्यवहारांच्या सूचना दिल्या जातात. त्यासाठी वरिष्ठांच्या कार्यालयीन कामकाजाची पद्धत, कर्मचाऱ्यांची नावे आणि संपर्क क्रमांक यांसारख्या माहितीचा गैरवापर होऊ शकतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने वरिष्ठांच्या आवाजाची नक्कल करून विश्वास संपादन करण्याचाही धोका आहे. त्यामुळे संदेश पाठविणाऱ्या व्यक्तीची ओळख खरी असल्याचा भास निर्माण होऊ शकतो.

फसवणूक टाळण्यासाठी काय करावे

वरिष्ठांच्या नावाने पैसे पाठविण्याचा मेसेज आल्यास संबंधित अधिकाऱ्याच्या पूर्वीपासून वापरात असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून खातरजमा करावी. नवीन बँक खात्यावर रक्कम पाठविण्यापूर्वी खातेदाराची माहिती तपासावी. मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी दोन अधिकाऱ्यांची मंजुरी घेण्याची पद्धत ठेवावी. संशयास्पद लिंक, झिप फाइल किंवा ई-मेलमधील अटॅचमेंट उघडणे टाळावे. व्हॉटस् ॲपमधील लिंक्ड डिव्हाइस नियमित तपासावीत. फसवणूक झाल्यास संबंधित बँकेला तातडीने माहिती देऊन १९३० या सायबर हेल्पलाइनवर किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. व्यवहाराचे तपशील आणि संबंधित मेसेजचे पुरावे जतन करावेत.

बँक खाते हॅक न करताही आर्थिक फसवणूक

बॉस फ्रॉडचे वैशिष्ट्य म्हणजे सायबर चोरट्यांना कर्मचाऱ्यांचे बँक खाते हॅक करण्याची आवश्यकता नसते. वरिष्ठांच्या सूचनेनुसार अधिकृत व्यवहार करीत असल्याच्या समजुतीतून कर्मचारी स्वतःच पैसे पाठवतात. त्यानंतर चोरटे संबंधित रक्कम इतर खात्यांमध्ये वळवतात. आर्थिक व्यवहारांसाठी स्वतंत्र मंजुरीची व्यवस्था नसणे, एकाच कर्मचाऱ्याकडे पैसे पाठविण्याचे अधिकार असणे आणि बँक खात्यांमधील बदलांची पडताळणी न होणे, अशा त्रुटींचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. त्यामुळे कंपन्यांनी आर्थिक व्यवहारांची अंतर्गत नियंत्रण व्यवस्था मजबूत करणे आवश्यक आहे. तसेच संगणकांची सुरक्षा अद्ययावत ठेवणे आणि कर्मचाऱ्यांना सायबर फसवणुकीच्या बदलत्या पद्धतींबाबत प्रशिक्षण देणे महत्त्वाचे ठरत आहे.

सायबर गुन्हेगार आता केवळ अनोळखी व्यक्तींच्या नावाने संपर्क साधत नाहीत, तर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील विश्वासाचा गैरफायदा घेण्याचाही प्रयत्न करतात. अशा गुन्ह्यांमध्ये पैसे पाठविणारा कर्मचारी स्वतः व्यवहार करीत असल्याने फसवणूक लक्षात येण्यास विलंब होऊ शकतो. त्यानंतर रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवली गेल्यास तपास अधिक गुंतागुंतीचा होतो. त्यामुळे संशयास्पद आर्थिक व्यवहाराची माहिती पोलिसांना तातडीने मिळणे महत्त्वाचे आहे.’
रवीकरण नाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT