Political News Pudhari
पिंपरी चिंचवड

Political News: पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करणार; प्रशांत शितोळे यांचा इशारा

पक्षाची बदनामी रोखण्यासाठी ही कारवाई खरोखरच केली जाणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: सर्वसााधारण सभेत पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यास किंवा वक्तव्य केल्यास हयगय केली जाणार नाही. त्या नगरसेवकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी मंगळवार (दि. ३०) पत्रकार परिषदेत दिला. मात्र, पक्षाची बदनामी रोखण्यासाठी ही कारवाई खरोखरच केली जाणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

भाजपाला लागणार शिस्त !; प्रदेश पदाधिकार्‍यांनी टोचले कान; डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी कोअर कमिटी ठरविणार धोरण, असे ठळक वृत्त दैनिक पुढारीने मंगळवार (दि. ३०) प्रसिद्ध केले.

त्याची शहरातील राजकीय क्षेत्रात खूपच चर्चा झाली. सोशल मीडियावर ते वृत्त व्हायरल झाले. त्याची दखल घेऊन सत्तारूढ पक्षनेते शितोळे यांनी मंगळवारी सायंकाळी तातडीने पत्रकार परिषद घेत, पक्षाची भूमिका सविस्तरपणे स्पष्ट केली.

प्रशांत शितोळे म्हणाले की, विविध कारणांमुळे पक्षाची प्रतिमा डागाळत आहे. ती प्रतिमा चांगली करण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. कोअर कमिटीमध्ये ठरलेल्या पक्षाच्या भूमिकेनुसारच सर्वसाधारण सभेत नगरसेवकांना बोलावे लागणार आहे. पक्षविरोधी वक्तव्य केल्यास किंवा पक्षाची भूमिका मान्य न केल्यास त्या नगरसेवकांवर कठोर कारवाई केली जाईल.

पुनावळेतील जागा भाड्याने देण्याचा विषय प्रशासकीय काळातील

पुनावळे येथील ९१ गुंठे जागा खासगी संस्थेला नाममात्र भाडे तत्वावर देण्याचा विषय त्या प्रभागातील भाजपाच्या चारही नगरसेवकांचा विरोध डावलून मंजूर करण्यात आला. त्या नगरसेवकांवर कारवाई करणार का, या प्रश्नावर प्रशांत शितोळे म्हणाले की, ती जागा १०० टक्के ताब्यात नाही.

त्याबाबत निविदा प्रक्रिया प्रशासकीय काळात पूर्ण करण्यात आली होती. त्या प्रभागातील नगरसेवकांनी प्रस्तावाबाबत उपयुक्त सूचना केल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही.

पाणी टंचाई व इतर नागरी समस्या सभागृहात मांडल्यास कारवाई करणे, उचित ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षनेत्यांच्या या इशार्‍यानुसार अनुभवी तसेच, नखवे नगरसेवक सभागृहात कामकाज करणार का, यावरून महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.

नगरसेवकांना प्रशिक्षण देण्याचा मुहूर्त अखेर ठरला

सत्ताधारी भाजपासह अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) सर्व १२८ नगरसेवकांना महापालिका कामकाजाचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

हे प्रशिक्षण १० ते १२ जुलै या असे तीन दिवस भाईंदर, मुंबई येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे देण्यात येणार आहे. या निवासी प्रशिक्षणामध्ये नगरसेवकांना प्रभाग व्यवस्थापन, अर्थसंकल्प नियोजन, प्रशासकीय कायदे, जनसंपर्क व प्रभावी सभागृह कामकाज याविषयी तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे, असे शितोळे यांनी सांगितले.

१२८ नगरसेवक सक्षम असताना स्वीकृत नगरसेवक हवेत कशाला

महापालिकेत एकूण १२८ नगरसेवक निवडून आले आहेत. ते सर्व आपआपल्या प्रभागांत व्यवस्थित काम करत आहेत. ते सर्व सक्षम आहेत. त्यामुळे सध्या तरी, स्वीकृत नगरसेवकांची गरज वाटत नाही.

स्वीकृत नगरसेवक कधी नेमणार, याबाबत सारखे सारखे विचारून नाहक वेळ वाया घालवू नका. त्याबाबत फेरप्रस्तावाची उपसूचना देऊन तो प्रस्ताव दप्तरी दाखल केला आहे, असे प्रशांत शितोळे यांनी स्पष्ट केले आहे.

विरोधी पक्षनेते सांगवी पुलावर आताच का बोलले याचा शोध घ्यावा

ममतानगर, सांगवी येथील मुळा नदीवरील पुलाच्या रोषणाईवर तब्बल १७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी सोमवार (दि. २९) केला आहे.

त्या प्रश्नावर सांगवी प्रभागाचे नगरसेवक असलेले प्रशांत शितोळे म्हणाले की, पुलाची उभारणी तसेच, रोषणाई व सुशोभीकरणाचे काम प्रशासकीय राजवटीत झाले आहे. विरोधी पक्षनेत्यांना त्या कामाबाबत आता जाग आल्याने आश्चर्य वाटते. त्यांना ते पत्र काढण्याबाबत कोणी सांगितले, याचा शोध घ्यायला हवा. त्या माध्यमातून सांगवीची नाहक बदनामी होत आहे. मी सांगवीचा नावलौकीक वाढवत आहे, असा दावा शितोळे यांनी केला आहे.

साठ कोटींचे प्रकरण उकरून काढू नका

बोगस उपसूचना देऊन मर्जीतील ठेकेदारांची तब्बल ६० कोटी १८ लाख रुपयांची बिले देण्याचा आर्थिक घोटाळ्यात आयुक्तांनी काहीच कारवाई केली नाही. फौजदारी गुन्हा दाखल झाला नाही. त्या प्रश्नावर शितोळे म्हणाले की, उपसूचनांवर नगरसेवकांनी सह्या केल्या. मात्र, त्यावर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी लेखा व वित्त विभागाची आहे.

त्या प्रकरणातील दोषी अधिकारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांची त्या काळात बदली झाली. तसेच, आयुक्तांकडे त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. त्या संदर्भातील चौकशी अहवाल राज्य शासनाकडे पाठवला आहे. ते त्याबाबत निर्णय घेतील. आमच्या दृष्टीने आता हे प्रकरण संपले आहे. पुन्हा पुन्हा उकरून हे प्रकरण काढून महापालिकेची बदनामी करू नये, असे प्रशांत शितोळे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT