Shailaja More Controversial Statement Pudhari
पिंपरी चिंचवड

Shailaja More: '... तर ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार!', भाजप नगरसेविकेच्या विधानाने पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

Shailaja More Controversial Statement: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विद्युत दाहिन्या दुरुस्त नसल्याच्या मुद्द्यावरून भाजपच्या नगरसेविका शैलजा मोरे यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

Rahul Shelke

Shailaja More Controversial Statement: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या अखत्यारितील स्मशानभूमींमधील विद्युत दाहिन्या वारंवार बंद पडत असल्याच्या मुद्द्यावरून प्रशासनाला जाब विचारताना मोरे यांनी संबंधित ठेकेदाराला थेट “विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार” असे वक्तव्य केले.

या वक्तव्यामुळे लोकप्रतिनिधींच्या भाषेवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करताना लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारची टोकाची भाषा वापरणे कितपत योग्य, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

विद्युत दाहिन्या बंद; नगरसेविकेचा प्रशासनावर संताप

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये असलेल्या विद्युत दाहिन्या दुरुस्त नसल्याचा मुद्दा शैलजा मोरे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. दाहिन्यांच्या दुरुस्तीबाबत प्रशासन आणि संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

या प्रश्नावर बोलताना मोरे यांनी प्रशासनाला संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. ठेकेदारांची नावे सभागृहात जाहीर करावीत, अशी मागणीही त्यांनी केली.

“ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार”

दुरुस्तीचे काम करूनही परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर आपण संबंधित ठेकेदाराविरोधात कठोर भूमिका घेऊ, असे सांगताना शैलजा मोरे यांचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

“त्यानंतरही ठेकेदारांनी सुधारणा केली नाही तर मी त्या ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार,” असे वक्तव्य त्यांनी सभागृहात केल्याची माहिती आहे.

मोरे यांच्या या विधानामुळे सर्वसाधारण सभेत तसेच सभागृहाबाहेरही चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, हे वक्तव्य करताना विरोधक सभागृहात उपस्थित नव्हते.

विरोधकांचा आधीच सभात्याग

बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेवरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद निर्माण झाला होता. सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला होता. दरम्यान, मोरे यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी भाजपकडून तत्काळ कोणतीही ठोस प्रतिक्रिया समोर आली नाही.

भाजपकडून कारवाई होणार का?

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर सध्या भाजपची सत्ता आहे. शहराच्या राजकारणात भाजप आमदार महेश लांडगे आणि शंकर जगताप यांचा प्रभाव आहे. अशा परिस्थितीत भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविकेने थेट महापालिकेच्या सभागृहात केलेल्या या वक्तव्यामुळे पक्षाची भूमिका काय असणार, हा प्रश्न आता चर्चेत आला आहे.

विकासकामांमधील त्रुटींवर लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेणे अपेक्षित असले तरी, संबंधित व्यक्तीला जिवंत जाळण्याची भाषा करणे हे कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शैलजा मोरे यांच्या या वक्तव्यावर भाजप नेतृत्व काही भूमिका घेणार का आणि प्रशासन याबाबत काय पाऊल उचलणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT