गणेश विनोदे
वडगाव मावळ: येत्या चार महिन्यांत होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीच्या माध्यमातूनच होण्याची शक्यता आहे. निष्ठावंतांना संधी देण्याची भूमिका पक्षनेत्यांनी घेतली आहे; परंतु मावळ तालुक्यातील महायुतीची स्थिती पाहता निष्ठावंतांना संधी देताना निष्ठावंत नेमके कोण? हा प्रश्न उभा राहणार असून, भाजपच्या इच्छुकांना निष्ठेची परीक्षा देण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. तर, राष्ट्रवादीत इच्छुकांची गर्दी असल्याने उमेदवारीसाठी स्पर्धा करावी लागणार आहे.
चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे न्यायालयाचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्यात रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायत, महापालिका या सर्वच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यांत पूर्ण होणार असून, राज्य सरकार व निवडणूक आयोग त्यादृष्टीने तयारीलाही लागले आहे.
तसेच, या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जातील, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवत महायुतीने राज्यात एकहाती सत्ता आणली आहे. त्यामुळे हाच अजेंडा कायम ठेवत स्थानिक स्वराज संस्था ताब्यात घेण्यासाठी महायुतीच्या माध्यमातूनच निवडणुका होण्याचे स्पष्ट दिसत आहे.
दरम्यान, महायुतीचा अजेंडा कायम राहिला तर मावळ विधानसभा मतदारसंघात मात्र महायुतीची रचना नेमकी कशी असेल याबाबत अद्याप संभ्रम आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीने आमदार सुनील शेळके यांना अधिकृत उमेदवारी दिली आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी बंडाचे निशाण फडकवले. तर, माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या नेतृत्वाखाली मावळ तालुका भाजपने अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा दिला.
विधानसभेला महायुतीत बंडखोरी
आमदार शेळके यांना महायुतीची उमेदवारी असताना महायुतीतील प्रमुख घटक असलेल्या स्थानिक भाजपने अपक्ष उमेदवार भेगडे यांना पाठिंबा दिला असला तरी लोणावळा, तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ या प्रमुख शहरासह ग्रामीण भागातील काही भाजपच्याच मातब्बर पदाधिकार्यांनी मात्र महायुतीचा धर्म पाळत असल्याचे सांगत आमदार शेळके यांना साथ दिली.
त्यामुळे या निवडणुकीत एकनिष्ठ म्हणून ओळख असलेल्या भाजपातच दुही निर्माण झाली. तसेच, राष्ट्रवादीच्या काही पदाधिकार्यांनी अपक्ष उमेदवार भेगडे यांना साथ दिली, त्यामुळे हीच परिस्थिती राष्ट्रवादीतही झाली.
एकीकडे मावळ तालुका भाजप पदाधिकार्यांनी सामूहिक राजीनामे देऊन अपक्ष उमेदवार भेगडे यांना पाठिंबा देण्याच्या घेतलेल्या निर्णयात सहभागी झालेले पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हेच खरे निष्ठावंत असल्याचा दावा करत आहेत.
इच्छुक संभ्रमावस्थेत
सद्यस्थितीत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), रिपब्लिकन पक्ष , स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, महायुतीचा धर्म पाळणारे भाजप पदाधिकारी व इतर मित्रपक्ष म्हणजे महायुती असे समीकरण दिसत आहे. तर, राज्यात महायुतीचा प्रमुख घटक असलेला भारतीय जनता पक्ष मात्र तालुक्यात विरोधी भूमिकेत दिसत आहे.
त्यामुळे मावळ तालुक्यात होणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, तळेगाव दाभाडे व लोणावळा नगर परिषद, वडगाव नगरपंचायत या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवायच्या म्हटले तर ही महायुती नेमकी कशी असेल, याबाबत इच्छुक मंडळी संभ्रमावस्थेत आहेत.
‘ते’ इच्छुकही वेट अँड वॉच
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याने निलंबनाची कारवाई झालेले राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकीसाठी इच्छुक होते. संबंधित पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चाही होती, परंतु अद्याप भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही व राष्ट्रवादीतूनही ते निलंबित झालेले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुका लढण्याची इच्छा आहे; परंतु सद्यस्थितीत अधिकृत कार्यकर्ता म्हणून कोणत्याही पक्षात सक्रिय नसल्याने संबंधित इच्छुकही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.